
शेतमालाला किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी संघटना उद्या सकाळी 11 वाजल्यापासून दिल्लीत धडक देण्यासाठी शांततेत मोर्चा काढणार आहेत. सोमवारी मोदी सरकारची फसवी एमएसपी गॅरंटी फेटाळून लावल्यानंतर आज शेतकरी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये इच्छाशक्ती असेल तर ते शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे संसदेचे अधिवेशन बोलावतील असे आव्हान मोदी सरकारला दिले. दरम्यान, सीमेवरील बॅरीकेड्स, सिमेंट काँक्रीटच्या दगडांनी बांधलेल्या भिंती तोडण्यासाठी शेतकऱयांनी जेसीबी आणि हायड्रॉलिक व्रेन आणल्या आहेत. अश्रुधुराच्या नळकांडय़ांचाही या मशीनवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने त्या डिझाईन करण्यात आल्या आहेत.
भाजप्रणीत सरकारने डाळी, मका आणि कापसाला पुढील पाच वर्षांसाठी किमान हमीभाव देण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या बैठकीनंतर शेतकऱयांसमोर ठेवला. परंतु, हा प्रस्ताव शेतकरी हीताचा नसल्याचे सांगत शेतकरी संघटनांनी तो फेटाळून लावला. त्यामुळे शेतकऱयांचे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी चर्चेची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. त्यामुळे बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतमालाला किमान हमीभाव कायद्याची आमची मागणी आहे. मोदींची इच्छाशक्ती असेल तर ते एक दिवसाचे अधिवेशन बोलावतील, विरोधी पक्ष त्याला अजिबात विरोध करणार नाहीत, असे शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांनी शंभु बॉर्डरवर वार्ताहारांशी बोलताना सांगितले.
विरोधकही एमएसपी कायद्याच्या बाजूने मतदान करतील
शिरोमणी अकाली दल किंवा काँग्रेस तसेच तृणमुल काँग्रेसह इतर विरोधी पक्ष एमएसपी कायद्याच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांनी व्यक्त केला. विरोधक शेतकऱयांच्या मागण्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत असेही ते म्हणाले.
…तर मोदींना कणखर पंतप्रधान म्हणू
भाजपाचे नेते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कणखर पंतप्रधान म्हणत असतात. मात्र, सध्या शेतकऱयांवर 18.5 लाख कोटींचे कर्ज आहे. जर मोदींनी शेतकरी आणि शेतमजूरांचे 80 कोटी कर्ज माफ केले तर आम्ही खऱया अर्थाने मोदी हे कणखर पंतप्रधान आहेत असे म्हणू असा टोलाही शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर यांनी लगावला.
तर सरकारला सत्तेत येऊ देणार नाही – राकेश टिकैत
मोदी सरकारने शेतकऱयांना दिल्लीत जाण्यापासून रोखले तर या सरकारला 2024 ला सत्तेत येण्यापासून रोखू असा इशारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवत्ते राकेश टिकैत यांनी दिला आहे. शेतकरी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
50 शेतकऱयांना अटक
राज्य सरकारने 1 हजार 800 एकर जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला दिला नाही, याविरोधात दिल्लीकडे कुच करणाऱया 50 शेतकऱयांना गुरुग्राम पोलिसांनी अटक केली. उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून आणखी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.





























































