
सामना प्रतिनिधी, धुळे
गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेती कसणे जिकरीचे होत आहे. परंतु त्याच वेळी होणारा पाऊस लक्षात घेऊन शेतीचे नियोजन केले आणि शेतीपूरक व्यवसाय केले तर शेती व्यवसाय टिकेल असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी व्यक्त केले. शहरातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी शेतीपूरक व्यवसाय यासंबंधी कार्यशाळा झाली.
कृषी महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने कृषी महाविद्यालयात कृषीपूरक व्यवसाय या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत दूध उत्पादनाविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले. विवेक सोनवणे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून सरासरी इतका पाऊस होत नसल्याच्या नोंदी आहेत. पाऊस कमी झाल्याने शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांचा विचार करायला हवा. त्यात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा आहे. कमी पर्जन्यमान लक्षात घेऊन शेतातल्या काही भागांत चाऱ्याचे उत्पादन घ्यावे. जातीवंत गाई आणि म्हशींचे पालन करावे. त्यातून बऱयापैकी दुधाचे उत्पन्न घेता येईल. पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील यंदा घट होण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी कमी दिवसांत येणाऱया भाजीपाल्याचा विचार करावा. शेती कसण्यापूर्वी आपल्या परिसरातील लोकांची गरज काय? याचाही अभ्यास शेतकऱ्यांनी करायला हवा.
योग्य पद्धतीने नियोजन करून शेती कसली आणि पूरक व्यवसाय केले तर दुष्काळाच्या परिस्थितीत आपण तग धरू शकतो, असे म्हणत सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या वेळी कृषी विभागाचे विवेक पाटील, पशुसंवर्धन अधिकारी पंकज रायतवार, सजिवकुमार, डॉ. रणजित पाटील, डॉ. नीलेश बारी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
summary- शेतीपूरक व्यवसाय केले तरच शेती टिकेल



























































