
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत एफडीएने मुंबईतील दहा आस्थापनांवर छापेमारी केली. छापेमारीदरम्यान या आस्थापनांमध्ये परवाना आणि नोंदणीमध्ये त्रुटी दिसून आल्या आहेत. त्या सर्व आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत.
मोहिमेमध्ये एफडीएने इस्लाम जिमखान्यातील हुमा कॅटरर, कांदिवलीतील मिल्कोज डेअरी प्रॉडक्ट्स, सांताक्रुझमधील ला पिनोझ पिझ्झा, विलेपार्लेतील एफथ्री कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, ऑपेरा हाऊसमधील नारायण डोसा, जे. जे. रुग्णालय परिसरातील सेंट्रल कॅण्टीन, चारकोपमधील पालीवाल डेअरी आणि मरीन लाइन्स परिसरातील नवाब ज्यूस सेंटर व अन्य दोन अशा दहा आस्थापनांवर बडगा उगारला आहे. या आस्थापनांमध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, वैद्यकीय प्रमाणपत्रे व प्रशिक्षणाचा अभाव आणि अन्न साठवणुकीमध्ये त्रुटी आढळल्याने एफडीएने त्या आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.
राज्यभरात 1.9 कोटींचा मुद्देमाल जप्त
राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेत पथकाने 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, कोकण विभाग, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या विविध जिह्यांतून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व तीन वाहने असा एकूण 1.9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच बारा गुन्हे दाखल करत तेरा जणांना अटक केली आहे.





























































