बेल्जियम बाद फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मॉस्को

गेल्या काही महिन्यांत दमदार खेळ करणाऱ्या युरोप खंडातील बेल्जियम संघाने आपला झंझावाती खेळ शनिवारीही सुरुच ठेवला आणि ट्युनिशियाचा ५-२ अशा फरकाने धुव्वा उडवला. या धडाकेबाज विजयासह बेल्जियमने फिफा वर्ल्ड कपमधील जी गटातून बाद फेरीत प्रवेश केला. तसेच सलग दोन पराभवांमुळे ट्युनिशियाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सलामीच्या लढतीत पनामाला हरवणाऱ्या बेल्जियमने दुसऱ्या लढतीतही त्याचीच पुनरावृत्ती केली.

बेल्जियमकडून एडन हझार्डने सहाव्या (पेनल्टी) व ५१व्या मिनिटाला, रोमेलु लुकाकूने १६व्या व ४८व्या मिनिटाला, मिशी बॅटशूएईने ९०व्या मिनिटाला गोल केले.

रोनाल्डोची बरोबरी

पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आतापर्यंत या स्पर्धेत चार गोल करीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती. पण बेल्जिमयच्या रोमेलू लुकाकूने शनिवारी दोन गोल करीत त्याच्या चार गोलची बरोबरी केली आहे.