
शिवाजी पार्क पोलिसांनी पकडून ठेवलेल्या आंदोलकांची सुटका केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. सरकारची दादागिरी आणि हुकूमशाही खपवून घेणार नाही असे सांगतानाच, मराठी मातीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या संविधानासाठी सदैव लढत राहू, असा इशारा त्यांनी दिला.
पोलिसांनी आंदोलकांना दिलेल्या वागणुकीबाबत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘‘शिवसेना पोलिसांसाठी, त्यांच्या घरांसाठी कायम लढत आली आहे आणि पोलिसांचेही शिवसेनेला सहकार्य राहिले आहे. पण काल ऑगस्ट क्रांती मैदानावर आणि आज शिवाजी पाका&तील आंदोलनात मुंबई पोलिसांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. आंदोलनाला आलेले तरुण, तरुणी आणि विद्यार्थ्यांची धरपकड सुरू होती. आम्ही वेळेत पोहोचलो नसतो तर या पोलिसांनी आंदोलकांना सोडले नसते. शिवसैनिकांनाही पोलीस ताब्यात घेत होते. शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव, माधुरी मांजरेकर यांनादेखील दोघांनी उचलले. एकीची तर साडी फाटली आहे. ही एवढी दादागिरी, हुकूमशाही या महाराष्ट्रात कदापि खपवून घेणार नाही, आम्ही शांत बसणार नाही, लढत राहू ’’, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
स्वतःच्याच नागरिकांविरुद्ध सरकार वॉर छेडतेय
दिल्लीत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवरील पोलिसी अत्याचाराचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. सीजेपी आंदोलन करणार म्हणून दिल्लीत कारगील आणि चीन युद्धातही नव्हते इतके पोलीस बल तैनात केले गेले आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान लावले गेले आहेत. भाजप विरुद्ध भारत हे चित्र आता रस्त्यावर दिसू लागले आहे. दिल्लीत पत्रकारांनादेखील सोडले नाही. असे हाल शिवसेना मुंबईमध्ये कदापि होऊ देणार नाही. स्वतःच्याच नागरिकांविरुद्ध सरकार वॉर छेडतेय आणि त्यांच्यावर वार करतेय, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
थोड्याच महिन्यात सत्ता बदलेल
देशातील वातावरण पाहता थोडय़ाच महिन्यात पेंद्रातील सत्ता बदलेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. विद्यार्थ्यांवर ज्यांनी ज्यांनी अत्याचार केले त्यांच्यावर त्यानंतर निश्चितच कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले.
सरकारची दडपशाही कुणावर
कालपासून ज्यांना ताब्यात घेतले जातेय त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेले जातेय. काल शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांना डोंगरी पोलीस ठाण्यात नेले होते आणि तिथून नंतर सांताक्रुझला नेले गेले. आज तुषार गांधींना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेले जातेय. हे कशासाठी चाललेय? ही दडपशाही कुणावर करतेय सरकार? शिवाजी पार्कला पोलीस छावणीचे रूप का दिलेय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.





























































