
लहान मुलींचा अनन्वित छळ आणि अमानुष गैरकृत्यांमध्ये कुख्यात असलेला जेफ्री एपस्टिन आणि केंद्र सरकारमधील एका मंत्र्याचे एकत्र आलेले फोटो अत्यंत धक्कादायक असून, या गंभीर विषयावर केंद्र सरकारने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे नमूद करत त्यांनी एक्सवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
एपस्टिनने केवळ अनैतिक आणि अमानुष कृत्येच केली नाहीत, तर या जाळ्यात ओढलेल्या प्रभावी व्यक्तींकडून संबंधित देशांची महत्त्वाची माहिती आणि राजनैतिक गुपिते सुद्धा वळवून घेतली, असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला आहे. एपस्टिनच्या अशा विकृत कृत्यांची तुलना महाराष्ट्रातील एका घटनेशी करत त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही धारेवर धरले. महाराष्ट्रात देखील अल्पवयीन मुलींचा नरबळी देऊन रक्ताने आंघोळ घालण्याचे प्रकार भोंदू बाबा खरातच्या माध्यमातून घडल्याची चर्चा आहे, मात्र राज्यापासून दिल्लीपर्यंत अनेक प्रतिष्ठित आणि प्रभावी लोक खरातचे अनुयायी असल्याने या प्रकरणाचा तपास दडपला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर त्या भोंदू खरातला अटक करण्यात आली, पण त्यानंतर या प्रकरणाचा तपास कुठवर आला आणि पुढे काय कारवाई झाली, याचे गूढ कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या पोकळ गप्पा मारणारे भाजप आणि त्यांचे नेते आता एपस्टिन फाइलच्या मुद्द्यावर मूग गिळून गप्प का बसले आहेत? असा संतप्त सवाल विचारत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

























































