
मुंबई महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेवरून भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण झाला असून भाजपचे नेते प्रवीण छेडा आणि माजी नगरसेविका बिंदू त्रिवेदी यांनी रितू तावडे यांच्यावर हल्ला केला. प्रभाग रचनेवरून बोलावलेल्या बैठकीनंतर हा हल्ला झाला. राजावाडी रुग्णालयात हात आणि खांद्यावर उपचार घेतल्यानंतर रितू तावडे यांनी माध्यमांसमोर येऊन आज टाहो फोडला.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यानंतर इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठाRकडे तिकिटासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार 2 जून रोजी भाजपने प्रभाग रचनेवर चर्चा करण्यासाठी अंतर्गत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भाजपच्या माजी महिला नगरसेविका बिंदू त्रिवेदी आणि प्रवीण छेडा यांनी बेसावध असलेल्या रितू तावडे यांच्यावर हल्ला केला. त्रिवेदी यांनी हाताने मारहाण करायला सुरुवात केली. प्रवीण छेडा यांनीही तावडे यांना धक्काबुक्की करत त्यांना पकडून ठेवले.
प्रवीण छेडा आणि बिंदू त्रिवेदी यांनी केलेल्या हाणामारीप्रकरणी तावडे यांनी भाजप कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसली तरी त्यांनी आपले म्हणणे एका व्हिडीओच्या माध्यमातून मांडून आपल्या दुःखाला मोकळी वाट करून दिली आहे. तावडे यांनी व्हिडीओत प्रवीण छेडा आणि बिंदू त्रिवेदी यांच्यावर धक्काबुक्की, मारहाणीचा आरोप केला आहे आणि या हल्ल्यामागे प्रभाग रचनेत झालेला बदल कारणीभूत असून त्यामुळेच माझ्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यात मी जखमी झाल्यामुळे राजावाडी रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर सर्वांसमोर आपली व्यथा मांडत आहे, असे तावडे यांनी व्हिडीओतून स्पष्ट केले.






























































