मुखेड तालुक्यातील दोघांचे अपहरण करून डांबले, शेतकी अधिकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

56

सामना प्रतिनिधी । लातूर 

मुखेड तालुक्यातील शिकारा पाटी येथून अपहरण करून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यात डांबून ठेवल्याप्रकरणी कारखान्याचे शेती अधिकारी अंबादास जाधव यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुद्रिकाबाई विठ्ठलराव टाळीकोटे रा. पांढूर्णी तालुका मुखेड यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा जळबा विठ्ठल काळकोटे ( वय 40) शिवाजी विठ्ठल टाळीकोटे (वय ३५) यांना मांजरा साखर कारखान्याचे  शेतकी अधिकारी अंबादास जाधव व लखादिवे त्यांनी ऊस वाहतूक ठेकेदार म्हणून पैसे दिले होते. मात्र वाहतुकीसाठी मजूर मिळाले नाहीत म्हणून  त्यांनी पैशाचा तगादा लावला होता. चार ते पाच वेळा सर्वजण गावी आले होते. त्यांनी दिलेले 18 लाख चार हजार रुपये घेऊन मुलाच्या कारचा चालक तातेराव  टाळीकोटे या सोबत घेऊन लातुर कडे जात असताना दिनांक 28 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी शिकारा पाटी  तालुका मुखेड येथून अंबादास जाधव व त्यांच्या 15 सहकाऱ्यांनी 4 बोलेरो जीप घेऊन येऊन मुलाचे अपहरण केले. दोघा मुलांना मांजरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळी गुप्त ठिकाणी ठेवून त्यांच्या छळ केला. पैसे देऊन मुलास घेऊन जा , कुठे वाच्यता केली तर मुलांना खतम करून अशी धमकी दिली. मुलांकडे तीन मोबाईल आहेत मात्र त्यांचा संपर्क होत नाही. आपल्या मुलांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार दिल्यावरून अहमदपूर पोलीस ठाण्यात मांजरा साखर कारखान्याचे शेती अधिकारी अंबादास जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात या प्रकाराने खळबळ उडाली.

आपली प्रतिक्रिया द्या