
मानखुर्द, मंडाला भागातील भंगार गोदामांना सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला भीषण आग लागली. त्यात 10 गोदामे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र गोदामे आणि त्यातील साधनसामग्री जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मानखुर्द, मंडाला भागातील 20 फिट रोड, मातंगनगर येथील झोपडपट्टीत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. आग अवघ्या 20 मिनिटांत भडकली. भडकलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठले होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 8 फायर इंजिन व 4 जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

























































