
भांडुपच्या ड्रीम्स मॉलला गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत मुंबई अग्निशमन दलाने जिगरबाज कामगिरी करत 67 जणांची सुखरूप सुटका केली. यासाठी 20 बंब, 15 टँकर, दोन एअरलिफ्ट लॅडर, एक रोबो फायटर याच्यासह 150 अग्निशमन दलाच्या जवानांचे टीमवर्क यशस्वी ठरले.
भांडुप पश्चिमेला ड्रीम्स मॉलमध्ये काल मध्यरात्री 12 वाजता लागलेल्या भीषण आगीत तिसऱया मजल्यावर असलेल्या सनराईज या खासगी कोरोना रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणायला सुरुवात केली. आजूबाजूचे रहिवासीही मदतीसाठी पुढे आले. मात्र मॉल आणि मजल्यांवर कॉस्मेटिक, गारमेंट्स, सॉफ्ट टॉयची दुकाने असल्यामुळे धूर आणि आग हळूहळू पसरत होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आत शिरून अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र शुक्रवारी पहाटे आगीने भीषण रूप धारण केल्यामुळे अग्निशमन दलाने आगीला लेव्हल-4 ची आग घोषित केली. त्यामुळे अधिक कुमक मागवण्यात आली. आग नियंत्रणात आणण्यासाठी 20 बंब, 15 टँकर, दोन एअरलिफ्ट लॅडर, एक रोबो फायटर याच्यासह 150 अग्निशमन दलाचे जवान कामाला लागले. फिरत्या शिडय़ा आणि एअरलिफ्ट लॅडरचा वापर करत तिसऱया मजल्यावर अडकून पडलेल्यांना बाहेर काढले. एकून 67 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, मॉलमध्ये आणखी कोणी अडकून पडले आहे का याचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने टप्प्याटप्प्याने अग्निशमन दलाच्या जवानांचे दिवसभर सर्च ऑपरेशन सुरू होते.
तीन वर्षे होते बंद रुग्णालय
ड्रीम्स मॉलच्या तिसऱया मजल्यावर असलेले सनराईज रुग्णालय गेले तीन वर्षे बंद होते, मात्र मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यावर रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने काही अटींवर कोरोना रुग्णांसाठी हे रुग्णालय पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यास परवानगी दिली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. हे रुग्णालय रहिवाशी परिसरात तसेच मॉलच्या तिसऱया मजल्यावर पुन्हा सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध होता.
दोन दिवसांत अहवाल येणार – महापौर
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आगीची घटना समजल्यानंतर काल मध्यरात्रीच दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी पुन्हा महापौरांनी घटनास्थळी भेट दिली. सनराइज रुग्णालय 28 फेब्रुवारीला बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्यांनी 31 मार्च 2021 पर्यंत रुग्णालय सुरू ठेवण्याची परवानगी मागितली होती. कोरोना रुग्णवाढीमुळे हे रुग्णालय सुरू होते. आगीचा चौकशी अहवाल दोन दिवसांत सादर होणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार सुनील राऊत, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, नगरसेविका सुवर्णा करंजे, उपायुक्त देविदास क्षीरसागर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.































































