
सामना प्रतिनिधी । माहूर
माहूर शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी तथा नगराध्यक्ष फिरोज दोसानी व पत्रकार सरफराज दोसानी यांचे बंधू जुनेद कादर दोसानी यांच्या माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास भीषण आग लागल्याने फायबर फर्निचरचे साहित्य व गोदामाचे शेड जळाल्याने अंदाजे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दि.१६ रोजी सकाळी ७ ते ७.३० वा दरम्यान घडली आहे.
माहूर शहरात आज सकाळी सकाळी मोठ मोठे धुराचे लोळ आकाशात दिसत असल्याने नागरिकांनी धुराच्या दिशेने धाव घेतली असता शहरातील आबासाहेब पारवेकर नगरमध्ये दोसानी यांच्या फायबर फर्निचरच्या गोदामाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसत होते. माहूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी कु.विद्या कदम कार्यालय अधीक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेतली. व किनवट, पुसद, उमरखेड येथील नपच्या अग्निशमक वाहन बोलविले. आग आटोक्यात आणण्यासाठी माहूर न.प.च्या अग्निशमन वाहनाने तीन फेऱ्या करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले तर नगरसेवक इलियास बावाणी, न.प. चे स्वच्छतादूत गणेश जाधव व न.प.चे सर्व कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी बचाव कार्यात झोकून देत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना आग विझवितांना आगीच्या दाहकतेचे चटके लागल्याने किरकोळ दुखापत झाली. तर नगरसेवक इलियास बावानी बालंबाल बचावले.
सदर गोदामाच्या आगीचा फटका शेजारील काही घरांनाही बसला असून एकंदर चार हजार स्के.फूट गोदामात असलेले एकूण ६० लाख रुपये किंमतीचे फायबर खुर्च्या, फोमच्या गाद्या व फायबर फर्निचर, फ्रीज, कुलर, कपाट व विक्रीसाठी असलेले गृहउपयोगी साहित्य जळून खाक झाले. तब्बल अडीच तासानंतर आग अग्निशमक दलाने व नागरीकांनी अथक प्रयत्नाने आटोक्यात आली.
सदर गोदामात वीजपुरवठा नसल्याची माहिती असून आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सदर आग ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याची उलट सुलट चर्चा बघ्याच्या गर्दीतून ऐकावयास मिळाल्याने या आग प्रकरणात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच किनवट-माहूरचे आ.प्रदीप नाईक, जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, जि.प. सदस्य संजय राठोड, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ए.डी.जहारवाल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, माहूर पं.स.चे गटविकास अधिकारी विशालसिंह चौहान, माहूर कृउबास सभापती दत्तराव मोहिते, विनोद राठोड, शिवसेना शहरप्रमुख निरधारी जाधव, सामाजिक कार्यकर्ते आनंद तुपदाळे पाटील, नगरसेवक रहेमत अली, रा.कॉ. तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, किशन राठोड, पं.स. सदस्य उमेश चव्हाण, सदाशिव राठोड, फिरोजखान पठान, रउप सौदागर, शहरातील व्यापारी बाबूलाल जयस्वाल, बरकतअली थारानी, व सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार व बहुतांश नागरिकांनी दोसानी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

































































