वांजळी गावात पानटपरी चालकावर गोळीबार; तिघे हल्लेखोर फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेल्हे तालुक्यातील वांजळी गावात दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका पानटपरी चालकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात पानटपरी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विलास नथु बोरगे (वय 24, वांजली गाव) असे जखमी झालेल्या पानटपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांजळी गावात दिलीप यांची पानटपरी आहे. रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास तिघेजण दुचाकीवर त्याठिकाणी सिगारेट घेण्यासाठी गेले होते. सिगारेट घेतल्यानंतर ते निघून गेले. मात्र, थोड्या वेळातच ते पुन्हा दुचाकीवरुन त्याठिकाणी परतले. त्यातील एकाने पिस्तूल काढून विलास यांच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी विलास यांच्या छातीत शिरल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. गोळीबाराची माहिती मिळताच वेल्हे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर दुचाकीवरुन फरार झाले असून त्यांची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुचाकीवर आलेल्या तिघांनी पानटपरी चालक विलास बोरगे यांच्यावर गोळीबार केला आहे. त्यामुळे ते जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
-पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग