
नव्या दमाच्या खेळाडूंचा भरणा असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची उद्या बुधवार, 16 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम सुरू होणार आहे. कारण आठ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात बुधवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सलामीचा टी-20 सामना रंगणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी-20 संघाच्या मोर्चेबांधणीसाठी संघनिवड समितीच्या नजरा ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर आदी युवा खेळाडूंच्या कामगिरीवर असणार आहेत.
आयपीएलमधील ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी असलेल्या ऋतुराज गायकवाडला विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. लोकेश राहुल जायबंदी असल्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने ऋतुराज डावाची सुरुवात करू शकतो. व्यंकटेश अय्यरही सलामीसाठी दुसरा पर्याय असेल. माजी कर्णधार विराट कोहलीसुद्धा डावाची सुरुवात करू शकतो. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवसारखा प्रतिभावान फलंदाज आहे. खालच्या क्रमांकावर शार्दुल ठाकूर, दीपक चाहर व हर्षल पटेल असे चांगले पर्याय आहेत. हिंदुस्थानच्या गोलंदाजी ताफ्यात शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल व रवी बिष्णोई असे अनेक पर्याय आहेत.
टी-20त विंडीज धोकादायक
टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचा संघ जगातील सर्वात धोकादायक संघ होय. इंग्लंडसारख्या बलाढय़ संघाला त्यांनी घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत 3-2 फरकाने धूळ चारलेली आहे. विंडीजकडे खोलवर फलंदाजी असून एकहाती सामना फिरविणारे काही फलंदाजही त्यांच्या दिमतीला आहेत. जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, अकील हुसैन व कायरॉन पोलार्ड अशा अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीत हिंदुस्थानसाठी ही मालिका नक्कीच सोपी नसेल.




























































