
19 वर्षांखालील महिलांच्या पहिल्यावहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघाचा झंझावात दुसऱया सामन्यातही दिसला. श्वेता सेहरावत आणि शेफाली शर्मा यांच्या सातत्यपूर्ण दणकेबाज खेळय़ा आणि दमदार सलामीच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने यूएईचा 122 धावांनी पराभव करीत सलग दुसऱया विजयाची नोंद केली. 34 चेंडूंत 78 धावांची घणाघाती खेळी करणारी कर्णधार शेफाली वर्मा विजयाची शिल्पकार ठरली.
सलामीच्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहज मात करणाऱया हिंदुस्थानी संघाच्या दुसऱया विजयाची शिल्पकार सलामीवीर श्वेता सेहरावत आणि कर्णधार शेफाली वर्मा ठरल्या. गेल्या सामन्यात दोघींनी 77 धावांची सलामी दिली होती तर आज 8.3 षटकांत 111 धावांची भागी रचली. हीच खेळी हिंदुस्थानच्या विजयाचा पाया ठरली. सलामीच्या सामन्यात नाबाद 92 धावा करणाऱया श्वेताने आजही 74 धावांची नाबाद खेळी केली, पण तिला साथ देणाऱया कर्णधार शेफाली वर्माने 12 चौकार आणि 4 षटकारांचा वर्षाव करीत 34 चेंडूंतच 78 धावा ठोकल्या. शेफालीनंतर सेहरावतने रिचा घोषबरोबर दुसऱया विकेटसाठी 89 धावांची भागी रचली. या दोन भागींमुळेच हिंदुस्थान 20 षटकांत 219 धावा करू शकला. रिचाने 29 चेंडूंत 49 धावा केल्या. हिंदुस्थानने उभारलेला 220 धावांचा डोंगर यूएईला पेलवलाच नाही. अत्यंत नवख्या असलेल्या या संघाने पूर्ण 20 षटके फलंदाजी केली, पण त्यांचा संघ धावांची शंभरीही ओलांडू शकला नाही.
बेनोनी – हिंदुस्थानप्रमाणे बांगलादेशच्या महिला संघानेही आपल्या सलग विजयाची नोंद केली. बांगलादेशने एका थरारक सामन्यात श्रीलंकेचा 10 धावांनी पराभव केला तर पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेने स्कॉटलंडला नमवत आपल्या विजयाचे खाते उघडले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या विजयाची नोंद करताना अमेरिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला.
19 वर्षांखालील महिलांच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हिंदुस्थानपाठोपाठ बांगलादेशनेही दुसरा विजय मिळविला. बांगलादेशने अफिया प्रोत्ताशा (53), दिलारा अकतर (ना. 36) आणि शोरना अकतर (ना. 50) यांच्यामुळे 2 बाद 165 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सलामीवीर लवकर बाद झाले, मात्र विश्मी गुणरत्ने (ना. 60) आणि देवमी विहंगा (55) यांनी 96 धावांची भागी रचून संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या, पण ही जोडी फुटताच लंकेला 22 चेंडूंत 36 धावांची गरज होती, पण बांगलादेशी गोलंदाजांच्या अचूक माऱयामुळे लंकेला हे लक्ष्य गाठता आले नाही.
सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाने अमेरिकेचा डाव 64 धावांत गुंडाळला आणि 65 धावांचे माफक आव्हान 8.4 षटकांतच एका फलंदाजाच्या मोबदल्यात गाठले.
दक्षिण आफ्रिकेने कायला रेनेकच्या 53 धावांच्या झुंजार खेळीमुळे 20 षटकांत 7 बाद 112 धावा केल्या होत्या तर मेडिसन लॅण्डस्मनने स्कॉटलंडचे 4 खेळाडू 16 धावांत बाद करीत त्यांचा डाव 68 धावांतच गारद केला आणि 44 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान 20 षटकांत 3 बाद 219 (श्वेता सेहरावत 74, शेफाली वर्मा 78, रिचा घोष 49; समायरा धरनीधारका 4-0-33-1)
यूएई 20 षटकांत 5 बाद 97 (लावण्या केणी 24, महिका गौर 26; शबनम 3-0-21-1, टीटास साधू 4-1-14-1, मन्नत कश्यप 3-0-14-1, पार्शवी चोप्रा 3-0-13-1)






























































