
सामना प्रतिनिधी । धाराशिव
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी हनूमंत ढेरे यास येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधिश श्रीमती आर. जे. राय यांनी पाच वर्षाची सक्त मजुरी व १२ हजार दंडाची शिक्षा सुनावली.
धाराशिव शहरातील एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक २९ मार्च २०१७ रोजी आपली शाळा आटोपून घरी आली. यानंतर जेवण करुन दुपारी ३ ते ३.३०च्या दरम्यान ती खेळण्यासाठी बाहेर गेली असता आरोपी हनुमंत ज्योतीबा ढेरे (२४) याने सदर अल्पवयीन मुलीस जवळ बोलावून तीचा विनयभंग केला. यानंतर पिडीत मुलीने सदर घटना आई कामावरुन घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आईने यासंदर्भात शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात आरोपी हनुमंत ढेरे याच्या विरुध्द फिर्याद दाखल केली.
आनंद नगर पोलिसांनी या प्रकरणी भांदवि ३५४, ३५४ अ, तसेच बा. लै. अं. सं. अधिनियम कलम ६, ८, १० नुसार गुन्हा दाखल करुन येथील विशेष न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीत मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच या प्रकरणी शासकीय अभियोक्ता अॅड. महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायालयाच्या न्यायमुर्ती श्रीमती आर. जे. राय यांनी आज शनिवार, २९ डिसेंबर रोजी आरोपी हनुमंत ज्योतीराम ढेरे यास विविध कलमान्वये पाच वर्षे सक्त मजूरी व १२ हजार दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास आनखी एक वर्षे सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. दंडाच्या रक्कमेपैकी दहा हजार रुपये पिडीत मुलीस अथवा तिच्या आई – वडीलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

































































