
सामना प्रतिनिधी । जालना
जालना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांच्या न्यायालयाने वडारवाडी ता. परतुर येथील रहिवाशी आरोपी रामचंद्र येलप्पा धोत्रे यास मयत लिंबाजी वाघमारे यास ठार मारल्याच्या गुन्ह्यामध्ये पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. बाबासाहेब व्ही. इंगळे यांनी काम पाहिले.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ३१ डिसेंबर २०१५ रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान मौजे वडारवाडी ता. परतुर येथे फिर्यादीचे घरासमोर आरोपी रामचंद्र हा आला व त्याने लिंबाजी वाघमारे याच्याकडे बिडी मागितली. परंतु लिंबाजी याने बिडी न दिल्यामुळे आरोपी रामचंद्रने त्यास लाकडी दांड्याने हातावर, पायावर, छातीवर तसेच पोटावर मारहाण केली. सदरची घटना फिर्यादीची विमल व तिची मुलगी रमा यांनी प्रत्यक्ष पाहिली. उपचारादरम्यान ४ जानेवारी २०१६ रोजी लिंबाजी वाघमारे यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी विमल वाघमारे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रमा वाघमारे, वैद्यकीय अधिकारी वाय.ओ. राठोड, तपासीक अंमलदार सहा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व समोर आलेल्या पुराव्यावरुन आरोपी रामचंद्र धोत्रे याच्याविरुध्द भादंवि कलम ३०४ भाग-२ अन्वये गुन्हा सिध्द झाल्यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांनी आरोपीस पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चाकूने भोसकल्याप्रकरणी आरोपीस दीड वर्षे सक्त मजूरीची शिक्षा
दुसऱ्या एका घटनेत जालना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद द. टेकाळे यांच्या न्यायालयाने महात्मा गांधी रोड जालना येथील आरोपी गणेश प्रेमचंद भगत याने फिर्यादीस चाकूने मारहाण केल्याप्रकरणी दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. दिपक नारायणराव कोल्हे यांनी काम पाहिले.
४ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री ९.३०च्या सुमारास गोपाळपुरा बडीसडक येथे आरोपी गणेश भगत याने फिर्यादी भैयालाल बाबुलाल नंद यास तू माझ्या विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार का देतो असे विचारून चाकूने जखमी केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व समोर आलेल्या पुराव्यावरुन गणेश प्रेमचंद भगत यांच्या विरुध्द भादवि कलम ३२४ अन्वये गुन्हा सिध्द झाल्यामुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीपाद द. टेकाळे यांनी आरोपीस दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंडव दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



























































