
आठव्या मानांकित नार्वेच्या कॅस्पर रूडने कारकीर्दीत प्रथमच फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. दुसरीकडे महिला एकेरीत अव्वल मानांकित पोलंडची इगा स्विटेक अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीत दाखल झाली.
कॅस्पर रुडने चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत डेन्मार्कच्या होल्गर रुनचा 6-1, 4-6, 7-6(7/2), 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. ही मॅरेथॉन लढत 3 तास 18 मिनिटांपर्यंत रंगली. आता उपांत्य फेरीत कॅस्पर रुडपुढे 2014 मधील यूएस ओपनमधील विजेत्या मारिन सिलिचने आव्हान असेल. 20 व्या मानांकित क्रोएशियाच्या सिलिचने सातव्या मानांकित रशियाच्या आंद्रे रुबलेवचा 5-7, 6-3, 6-4, 3-6, 7-6(10/2) असा पराभव करून आगेकूच केली. उभय खेळाडूंचा घामटा काढणारी ही लढतही 4 तास 10 मिनिटांपर्यंत रंगली. अखेरचा निर्णायक सेट टायब्रेकपर्यंत ताणल्याने दोन्ही खेळाडूंच्या पाठीराख्यांची घालमेल वाढली होती, मात्र या थरारक लढतीत शेवटी सिलिचने बाजी मारली.
रोहन बोपन्नाचे स्वप्न भंगले
कारकीर्दीत प्रथमच फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत दाखल झालेल्या हिंदुस्थानच्या रोहन बोपण्णाचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न गुरुवारी भंगले. बोपण्णा व नेदरलॅण्डचा माटेव मिडलकूप या 16 व्या मानांकित जोडीला उपांत्य लढतीत सल्वाडोरचा मार्शेलो एरेवालो व नेदरलॅण्डचा जीन जुलिन रॉजर या 12 व्या मानांकित जोडीने 4-6, 6-3, 7-6(10/8) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. बोपण्णा-मिडलकूप जोडीने पहिला सेट जिंकून झकास सुरुवात केली होती, मात्र प्र्रतिस्पर्धी जोडीने दुसरा सेट जिंकून लढतीत पुनरागमन केले. त्यानंतर टायब्रेकमध्ये गेलेला तिसरा व निर्णायक सेट जिंकून एरेवालो-रॉजर जोडीने आगेकूच केली.
स्विटेकचा सलग 33 वा विजय
महिला गटात इगा स्विटेकने आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना 11 व्या मानांकित अमेरिकेच्या जेसीका पेगुला हिचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पाडाव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्विटेकचा हा सलग 33 वा विजय होय. सेरेना विल्यम्सच्या सलग 34 विजयापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. सेरेनाने 2013 मध्ये सलग 34 लढती जिंकण्याचा पराक्रम केला होता. 2020 मधील विजेत्या इगा स्विटेकची गाठ आता 20 व्या मानांकित रशियाच्या दारिया कासातकिना हिच्याशी पडणार आहे. दारियाने दुसऱया उपांत्यपूर्व लढतीत आपलीच देशभगिनी वेरोनिका कुदेरमेतोवा हिचा 6-4, 7-6 असा पराभव केला. दारिया कासातकिना हीदेखील कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे.




























































