आंब्याचो बापूस इलो! रत्नागिरी, देवगड हापूसच्या पहिल्या चार पेट्या एपीएमसीत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

हिंदुस्थानसह जगभरात आंबा खवय्यांचे विशेष आकर्षण असलेल्या कोकणच्या हापूस आंब्याच्या पहिल्या चार पेट्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये दाखल झाल्या. दिवाळीच्या मुहूर्तावर हापूस मार्केटमध्ये आल्यामुळे व्यापाऱयांचा उत्साह वाढला आहे. या पेट्यांची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा करून त्या ग्राहकांकडे रवाना केल्या.

देवगडमधील सागर बाणे आणि रत्नागिरी येथील उदय नरवणे या आंबा बागायतदारांच्या बागेतील प्रत्येकी दोन-दोन पेटय़ा एपीएमसी फळ मार्केटमधील तानाजी पाटे आणि दिनकर महांबरे यांच्या गाळ्यावर पाठविण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत हापूसची पहिली पेटी मार्केटमध्ये लवकर दाखल झाली आहे. सर्व व्यापाऱ्यांनी या पेट्यांची पूजा केली आणि नंतर त्या मुंबई व ठाणे येथील विक्रेत्यांकडे पाठविण्यात आल्या.

जुलै महिन्यातील मोहोर
आंब्याचा खरा हंगाम येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दोन्ही शेतकऱयांनी जुलैमध्ये आलेला मोहोर जतन करून ही फळे तयार केली. गेल्या चार महिन्यांत आंब्याचा मोहोर सांभाळणे फार कठीण काम असते, अशी प्रतिक्रिया फळ मार्केटचे व्यापारी, शिवसेना विभागप्रमुख विजय शेळके यांनी व्यक्त केली आहे.

यंदाचा हंगाम समाधानकारक होणार
यंदा समुद्रकिनाऱ्यांपासून 20 किलोमीटरच्या आत असलेल्या झाडांची पहिल्या मोहोराची फूट चांगली आहे, त्यामुळे यंदाचा संपूर्ण हंगाम समाधानकारक जाणार असल्याची शक्यता देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी व्यक्त केली आहे.