
येवला तालुक्यातील गवंडगाव शिवारातील टोलनाक्याजवळ दोन ट्रक चालकांना दमदाटी करत लूटमार करत असताना दोघा लुटारूंच्या मुसक्या तालुका पोलिसांनी आवळल्या आहेत. यातील एका आरोपी विरुद्ध शिर्डी, लोणी राहता, कोपरगांव या पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक ते संभाजीनगर मार्गावत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना अंदरसूल गावाच्या पुढे रस्त्यावर उभी असलेल्या ट्रकमध्ये संशयित हालचाल चालू असल्याचे लक्षात आल्याने रात्र गस्तीवरील पोलीस इरफान शहा, ज्ञानेश्वर पल्हाळ, नितीन पानसरे, आबा पिसाळ आदींनी घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ सदर ट्रक जवळ गेले. यावेळी त्यांनी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले.
तसेच सदर ठिकाणी उभी असलेल्या ट्रक (एमएच 15, डिके 0021) वरील चालक अशोक आनंदा निकम (रा. वाखारी ता. देवळा जि. नाशिक) याने सांगितले की, पक्षीखाद्य घेऊन जात असतांना ट्रक बंद पडल्याने ट्रक रोडचे कडेला उभी केली असता दोन जणांनी मोटार सायकलवर येऊन कोयत्याचा धाक दाखवून जबरी मोबाईल व रोख रक्कम लुटुन नेली आहे. त्याबाबत तपास चालू असतांना विकास विठोबा कदम (रा. गारखेडा ता. देवळगांवराज जि. बुलढाणा) यांने सांगितले की ट्रक (एमएच 12, आरएन – 7199) ही चालवून घेऊ जात असताना रोडवर ट्रक अडवून कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण दोन मोबाईल व 4300 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे सांगितले.
आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ लूटमार करण्यासाठी व धाक दाखविण्यासाठी लागणारा कोयता व लुटमारीचा मोबाईल व रोख रक्कम असा 44 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. आरोपी सुकदेव गोरख मोरे (27वर्ष, रा.शनिमंदीर राहता ता. राहता जि. अहमदनगर), विकास मधुकर कांबळे (24, रा. दहेगांव ता. राहता जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. आरोपी मोरे यांच्याविरुद्ध शिर्डी, लोणी राहता, कोपरगाव या पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे.पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा ज्ञानेश्वर हेंबाडे करीत आहेत.



























































