
>> उत्तरा मोने
पोलिओने आयुष्य ग्रासले असताना, हातापायांत व्यंग आले असताना त्यावर मात करीत स्वतःला घडवणारी गीता कॅस्टेलिनो. अथक प्रयत्न हेच तिच्या आयुष्याचे सूत्र तिला कार्यरत ठेवत आहे.
‘दिव्यांगत्व ही माझी ओळख नाही. माझं काम हीच माझी ओळख आहे.’ हे वाक्य जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर जगून दाखवलं असेल तर ती म्हणजे गीता नीळकंठ – कॅस्टलिनो.
अडीच वर्षांची असताना पोलिओने गीताच्या आयुष्याला मोठा धक्का दिला. हातापायांत व्यंग आलं, बोलण्याची शक्तीही काही काळासाठी हरपली. पुढची बारा वर्षे म्हणजे हॉस्पिटल, शस्त्रक्रिया, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि अखंड संघर्ष. वाडिया हॉस्पिटल हेच गीताचं दुसरं घर बनलं होतं, पण या सगळ्या वेदनेतही गीताच्या आई-वडिलांनी तिला कधीही दिव्यांग म्हणून वाढवलं नाही. घरात तिच्याशी नेहमीच्या मुलीसारखंच वागलं गेलं. ‘तू इतरांपेक्षा वेगळी आहेस’ हे वाक्य तिने कधी ऐकलंच नाही. उलट ‘तू करू शकतेस’ हा विश्वास तिला रोज दिला गेला. गीताचं संपूर्ण कुटुंब…आईवडील, आजी-आजोबा, बहीणभाऊ, नवरा, मुलगी, सासू -सासरे… सर्वांचाच तिच्या या प्रवासात सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच खडतर आयुष्य ती सुखकर बनवू शकली. हे ती नेहमीच सांगते.
या विश्वासाची एक हृदयस्पर्शी कहाणी गीताच्या शाळेशी जोडलेली आहे. बालमोहन विद्यामंदिरमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काही पालकांनी शाळेकडे तक्रार केली की, ही दिव्यांग मुलगी वर्गात असेल तर आमच्या मुलांवर परिणाम होईल. पण शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक दादासाहेब रेगे यांनी ठाम भूमिका घेतली. “गीता या शाळेतच शिकेल. गरज वाटत असेल तर तुमच्या मुलांचे लिव्हिंग सर्टिफिकेट तयार आहे” असं सांगून त्यांनी गीताच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी एका मुलीला केवळ शाळेत प्रवेश मिळाला नाही, तर समानतेचा अधिकार मिळाला.
गीताच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. दिव्यांग मुलांनी इतर मुलांबरोबरच शिकावं, वाढावं आणि समाजात वावरावं असा तिचा ठाम विश्वास आहे. बालपणापासून सामान्य शाळेत शिकल्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, स्पर्धेला सामोरं जाण्याची ताकद मिळाली आणि स्वतःकडे दयेच्या नजरेने नव्हे, तर समानतेच्या भावनेने पाहायला ती शिकली. म्हणूनच आजही शिक्षण व्यवस्थेत समावेशकतेला ती विशेष महत्त्व देते.
गीताच्या आईने नेहमीच तिला सगळ्याच बाबतीत पाठिंबा दिला आणि तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. आयुष्याची शिकवण तर दिलीच, पण त्याचबरोबर तिला नीटनेटके कपडे घालून आत्मविश्वासाने बाहेर पडायला शिकवलं. दोन्ही पायांत कॅलिपर्स असतानाही ती कशी टापटीप दिसेल, याचाही विचार आई करत असे. पुढे याच अनुभवातून गीताने ‘अडॅप्टिव्ह क्लोदिंग’ या संकल्पनेवर मोठं काम उभं केलं. अनिता अय्यर यांच्या ‘एकांश ट्रस्ट’सोबत विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी कपडे डिझाईन करण्याची चळवळ उभी राहिली. 55 कला महाविद्यालयांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दिव्यांगांच्या गरजा समजून घेत नावीन्यपूर्ण डिझाइन्स तयार केली. आज अनेक कला महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांमध्ये या डिझाइन्सचा समावेश होण्यामागे गीताचं मोठं योगदान आहे. गीता नेहमी सांगते की, कपडे हा केवळ फॅशनचा विषय नसून तो व्यक्तीच्या स्वाभिमानाशी जोडलेला असतो. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजांनुसार, सहज वापरता येतील आणि त्याच वेळी आत्मविश्वास वाढवतील असे कपडे मिळणे हादेखील समान संधीचाच एक भाग आहे. तिच्या पुढाकारामुळे अनेक तरुण डिझायनर्सनी दिव्यांग व्यक्तींच्या गरजा जवळून समजून घेतल्या. या उपक्रमातून केवळ नवे डिझाइन्स तयार झाले नाहीत, तर भविष्यातील डिझाइन शिक्षणालाही एक नवी सामाजिक दिशा मिळाली.
गीताची वाटचाल इथेच थांबली नाही. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ती व्याख्याती झाली आणि बत्तीसाव्या वर्षी प्राचार्य. भारतात अनेक फॅशन आणि टेक्स्टाईल संस्थांची उभारणी, अभ्यासक्रम निर्मिती, स्कॉटलंडच्या एडिनबर्ग कॉलेज ऑफ आर्टमध्ये अध्यापन, बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे मार्गदर्शन, सामाजिक मानसशास्त्र, शिक्षण, कला, डिझाईन आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांत गीताने आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
प्रसिद्ध कालाघोडा आर्ट फेस्टिव्हलच्या संस्थापक सदस्यांपैकी गीता एक आहे. गेली अनेक वर्षे देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या कला महोत्सवाच्या उभारणीत तिचा मोलाचा वाटा आहे. भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाला जागतिक स्पर्धेसाठी मानसिक तयारी करून देणाऱ्या टीममध्येही गीताचा समावेश होता. पुढे भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा त्या विजयामागे तिच्या समुपदेशनाचाही मोठा वाटा होता. अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गीताचा गौरव झाला आहे. आजही गीता एकामागोमाग एक नवे प्रकल्प हाताळत असते. अनेक संस्थांना धोरणात्मक मार्गदर्शन, अभ्यासक्रम निर्मिती, कॉर्पोरेट प्रशिक्षण, सामाजिक संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम अशा विविध जबाबदाऱ्या ती एकाच वेळी समर्थपणे सांभाळते. विशेष म्हणजे आपल्या दिव्यांगत्वाचा कधीच गाजावाजा न करता केवळ कामाच्या गुणवत्तेच्या बळावर तिने प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज गीता स्वतः मॉडिफाय केलेली कार चालवत देशभर फिरते. दोन दशकांहून अधिक काळ ती कार रॅली स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे.
गीता कॅस्टेलिनो यांची कहाणी ही केवळ एका यशस्वी स्त्रीची कहाणी नाही. ती समाजाला आरसा दाखवणारी कहाणी आहे. गीता म्हणते, दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको. समान संधी द्या. त्यांच्या गुणवत्तेचा आदर करा. तिच्या आयुष्याने हे सिद्ध करून दाखवलं आहे की, वेदना माणसाला थांबवत नाही. ती पुढे जाण्याचं इंधन बनू शकते. वेदनेला कुरवाळत बसण्यापेक्षा तिला ऊर्जेत रूपांतरित करणं हेच गीताच्या आयुष्याचं खरं सूत्र आहे.
























































