
सामना ऑनलाईन, कझान
गतविजेत्या जर्मनीसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे. ‘एफ’ गटात मेक्सिकोने सहा गुणांनिशी पहिले स्थान पटकावले असून त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश जवळपास पक्का आहे, पण जर्मनीला मात्र दक्षिण कोरियाला हरवल्याशिवाय पर्याय नाही. याच गटातील अन्य लढतीत स्वीडनलाही मेक्सिकोविरुद्ध विजय मिळवणे अत्यंत गरजेचे असणार आहे. एकूणच काय तर या गटातील पुढल्या फेरीत पोहोचणारे दोन संघ साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीनंतरच निश्चित होणार आहेत.
स्वीडन विजयी झाल्यास चार वेळच्या जगज्जेत्यांचा खेळ खल्लास
स्वीडनने अखेरच्या लढतीत मेक्सिकोला पराभूत केले. शिवाय जर्मनी-दक्षिण कोरिया यांच्यामधील लढत बरोबरीत राहिली. अशाप्रसंगी गतविजेत्यांवर साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढवेल. असे निकाल लागल्यास मेक्सिको व स्वीडन बाद फेरीत पोहोचणार. मात्र दोन्ही लढती बरोबरीत राहिल्यास मेक्सिकोसह जर्मनीलाच आगेकूच करण्याची संधी असेल. पण दक्षिण कोरियाने जर्मनीला पराभूत केल्यास त्यांचा मार्ग खडतर असेल एवढे मात्र नक्की.
दक्षिण कोरिया पराभूत झाल्यास…
जर्मनीने दक्षिण कोरियाला हरवल्यास गतविजेत्यांचे दोन विजयांसह सहा गुण होतील. तसेच आशिया खंडातील दक्षिण कोरियाचे आव्हानही यासोबत संपुष्टात येईल. मेक्सिकोने स्वीडनला पराभूत केल्यास या गटातून मेक्सिको नऊ गुणांसह अव्वल स्थानावर राहील आणि जर्मनी सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर असेल. अशा वेळी दोन्ही संघ पुढल्या फेरीत पोहोचतील.
ई गटात तिहेरी लढत
‘ई’ गटामध्ये बाद फेरीत पोहोचण्यासाठी तिहेरी लढत प्रकर्षाने दिसून येत आहे. कोस्टा रिकाचे आव्हान सलग दोन पराभवानंतर संपुष्टात आले आहे. तसेच ब्राझील व स्वित्झर्लंड चार गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. सर्बिया तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलला पुढल्या फेरीत पोहोचण्याची सर्बियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत किमान बरोबरीची अपेक्षा आहे. विजय झाल्यास उत्तमच, पण ही लढत त्यांनी हरायला नको. अन्यथा त्यांना स्वित्झर्लंड कोस्टा रिकाकडून पराभूत होण्याची वाट बघावी लागेल. त्यानंतरही गोलफरकात अव्वल असलेला संघच आगेकूच करेल, मात्र सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाल्यास या गटातून ब्राझील व स्वित्झर्लंड पुढे पाऊल टाकतील यात शंका नाही.
आजच्या लढत़ी
दक्षिण कोरिया – जर्मनी, कझान
रात्री ७.३० वाजता
मेक्सिको – स्वीडन, एकतेरीनबर्ग
रात्री ७.३० वाजता
सर्बिया – ब्राझील, मॉस्को
मध्यरात्री ११.३० वाजता
स्वित्झर्लंड – कोस्टा रिका, निझनी नोवगोरॉड
मध्यरात्री ११.३० वाजता




























































