घाटकोपर आग दुर्घटना -दोघांची प्रकृती गंभीर, सात जणांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर पंतनगरमधील आग दुर्घटनेतील दोघांची प्रकृती गंभीर असून चार जणांवर उपचार सुरू आहे. 14 जखमींपैकी सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एकाचा शनिवारी मृत्यू झाला होता. दरम्यान, दोघा गंभीर रुग्णांपैकी एकावर राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तर दुसऱयावर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱयाने दिली.

घाटकोपर येथील परख रुग्णालयाला लागून असलेल्या विश्वास इमारतीमधील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला शनिवारी दुपारी आग लागली. आगीमुळे धूर इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱया मजल्यावर असलेल्या परख रुग्णालयामध्ये पसरला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने 22 रुग्णांना इतर रुग्णालयात सुखरूप हलवण्यात आले. या आगीत एकूण 14 जण जखमी झाले. त्यापैकी कुरेशी देढीया (46) यांचा मृत्यू झाला. 13 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तुकाराम घाग, शेर परिहार यांनी स्वतःहून डिस्चार्ज घेतला आहे तर कुलसुम शेख, सना खान, हितेश करानी, के. पी. सुनार, अनिल मडगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आगीच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई जय यादव (51), संजय तडवी (40), नितीन विसवकर (35), प्रभू स्वामी (38) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तरुण–तरुणीची प्रकृती गंभीर!

आगीमध्ये 18 ते 20 टक्के भाजलेली तानिया कांबळे (18) हिला राजवाडी रुग्णालयातून नवी मुंबई येथील ऐरोलीतील बर्न रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या मुलीची प्रकृती गंभीर आहे. आगीच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या अधीश सहारिया (18) या तरुणावर राजावाडी रुग्णालयातील एमआयसीयूत उपचार सुरू आहेत.