गिरणगावचा गणपती

>> प्रकाश खांडगे

गणपती लोकनायक त्याचे वेदप्रामाण्य गिरणगावात खिसगणतीला नसे. ‘पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा’ हाच खरा गिरणगावचा गणपती. गिरणगावच्या गणपतीने नाटके आपलीशी केली. शाहिरांचे फड आपलेसे केले. राजकीय, सामाजिक आंदोलने आपलीशी केली.

कापड गिरणी कामगारांच्या दुर्दैवी, ऐतिहासिक संपाआधी गिरणगावात एक वेगळेच चैतन्य होते. गिरणगावातली माणसं नेमकी कशी होती याचं वर्णन करायला कविवर्य बोरकर यांच्या कवितेतली एक ओळ पुरेशी आहे ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी।’ खूप एकोपा होता गिरणगावात.

तिथल्या एखाद्या उत्तरप्रदेशी दुग्धालयाच्या दुधावरील साईसारखा. गणपती, नवरात्र, शिमग्यात तर अक्षरशः आनंदाला उधाण यायचं ‘श्रावण हंकारी हंकारी करा ग नागपंचमी साजरी’ असे म्हणत श्रावणात माय मावल्या एखाद्या मंदिराच्या पटांगणात अथवा भररस्त्यावर रात्री फेर धरायच्या, झिम्मा-फुगडी खेळायच्या. ‘धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा’ अशा फेराच्या गाण्यातील लोकरामायण, लोकमहाभारत सुरू असायचं. गणपतीचं आगमन भाद्रपदात, पण त्याची उत्सवाची चाहूल सुरू व्हायची श्रावणात. घरोघर पोथ्या लागत आणि गणपतीच्या आगमनाला सोबत सत्यनारायणाची पूजा बांधली जायची व त्यांची समाप्ती व्हायची. पांडवप्रताप, शिवलीलामृत, काशीखंड, नवनाथ, हरिविजय ग्रंथ लागत या ग्रंथातील प्रत्येक ओवीचा अर्थ एखादा बुवा त्याच्या प्रासादिक वाणीने सांगे. कोकणातली रायगड, रत्नागिरीकडची मंडळी दादर चौपाटी, गिरगाव चौपाटीवर ‘गणा धाव रे मला पाव रे’ म्हणत ढोल, झांज, ढोलकी वाजवत जमलेली असायची पश्चिम महाराष्ट्रातील भजनी मंडळ भारुड, भजनात दंग असायची. ‘सत्यनारायणा दयासागरा करी कृपा मज वरी, करी कृपा मजवरी मस्तक ठेवितो चरणावरी.’

सत्यनारायण, विठ्ठल, गणपती देवादिकांनीमध्ये भेदभाव नाही, जशी ज्याची श्रद्धा तसा देव. माणसं गणपतीच्या सणात गुण्यागोविंदाने नांदत. गणपती लोकनायक त्याचे वेदप्रामाण्य गिरणगावात खिसगणतीला नसे. ‘पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा’ हाच खरा गिरणगावचा गणपती. गिरणगावच्या गणपतीने नाटके आपलीशी केली. शाहिरांचे फड आपलेसे केले. राजकीय, सामाजिक आंदोलने आपलीशी केली. इतकेच काय, प्रकांड पंडितांच्या नेत्यांच्या, पत्रकारांच्या अभिरूप न्यायसभा, व्याख्याने आपलीशी केली. चिंचपोकळीची विवेकानंद व्याख्यानमाला याची साक्ष आहे, तर 1944 साली स्थापन झालेली नाटय़संस्था नवहिंद बाल मित्र मंडळ याची साक्ष आहे. केवळ नाटकेच नव्हेत गणेशोत्सावात ‘कला झंकार’ नावाचे तरुणाईला आकर्षित करणारे नवे पेव फुटले होते. ‘मयुर कला झंकार’, ‘श्रीधर कला झंकार’ अशी नावे असत. माया जाधव, माला केमकर, रजनी केमकर असे कलावंत या कला झंकारमधून चित्रपट नृत्यांची जादुई दुनिया गणेशोत्सवात उभी करायचे.

‘ओठो पे ऐसी बात मै दबा के चली आई’पासून ‘जानेवाले जरा होशियार यहा के हम है राजकुमार’ अशी गणपती नृत्ये कला झंकारमध्ये झंकारत असायची. गिरणगावात शाहिरांची मोठी परंपरा होती. आजही अपवादात्मक स्थितीत आहे. ‘पह्यलं नमन करितो वंदन, गणपती आला नाचुनी गेला हो’ हे नमन गीत ज्यांनी गाऊन अजरामर केलं ते शाहीर राजाभाऊ खामकर घोडपदेव व डी. पी. वाडीचे. समस्त शाहिरांचे मुकुटमनी पद्मश्री शाहीर साबळे आंबेकर नगरचे – आधी ते काळाचौकीला राहात. ‘शुभमंगल चरणी गण नाचला, नाचला कसा तरी पाहू चला हो’ हा पठ्ठेबापुरावांचा गण शाहीर साबळे यांनी लोकप्रिय केला. शाहीर आत्माराम पाटील यांनी गणाची देवताधिष्ठत संकल्पनाच बदलली. त्यापूर्वी भाऊ फक्कड, आण्णाभाऊ साठे यांनी ती बदललेलीच होती. आण्णाभाऊंनी ‘जना रुपी ये गणा’ म्हणत जनतेलाच जनार्दन मानले. आत्माराम पाटील यांनी गणराज्यातील ‘गण’ म्हणजे लोकच गणाधीश मानले. कवळी कंपाऊडमधील लोअर परळचे आत्माराम पाटील शाहिरांचे बिनीचे शिलेदार ते गणेशोत्सवात कृष्णकांत जाधव, खामकर, भरडकर अशा अनेक शाहिरांना घेऊन ‘शाहिरी फुलोरा’ कार्यक्रम सदर करीत. ‘शाहिरी फुलोरा’ गणेशोत्सवात सादर होताना ‘रानात रान बाई डांगाचं’, ‘झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबडय़ानं बांग दिली’, ‘डोंगरी शेत माझं ग बाई बेणू किती’ अशी कृषिसंस्कृतीला आपलीशी करणारी लोकगीते, लोकनृत्ये, भलरी गीते ही सदर होऊ लागली.

‘गणेशोत्सवात हमखास नवी मुक्तनाटय़े, प्रहसने आम्ही बसवायला घ्यायचो. गणेशोत्सवात केवळ मनोरंजन नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचे काम आम्ही करीत असू. नाटकाचा बंदिस्तपणा टाकून अंक, प्रवेश हा ढाचा स्वीकारून तमाशाचा मुक्तपणा आम्ही मुक्तनाटय़ात स्वीकारला,’ असे एकदा शाहीर साबळे यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत सांगितले होते. बापाचा बाप, कशी काय वाट चुकला, कोडय़ाची करामत, नशीब फुटकं सांगून घ्या, फुटपायरीचा सम्राट, आंधळं दळतंय, असुनी खास मालक घरचा ही मुक्त नाटय़े, प्रहसने म्हणजे शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली अनमोल देणगी. या सर्वांची प्रेरणा गणेशोत्सव हीच होती. राजा मयेकर, संजीवनी बीडकर, सुहास भालेकर, दादा कोंडके अशा अनेक मंडळींचा प्रेरणास्रोत गणेशोत्सव होता. मच्छिंद्र कांबळीच्या ‘वस्त्रहरण’ची प्रेरणाही परळच्या रेल्वे मैदानावर रंगलेले दशावतारी खेळ होते.

गिरणगावच्या गणेशोत्सवाने नाटय़ संस्कृती विकसित केली, कारण गणपतीत सादर झालेली नाटकेच पुढे गिरणी कामगारांच्या नाटय़ स्पर्धेत, राज्य नाटय़ स्पर्धेत सदर होऊ लागली. धार्मिक, ऐतिहासिक, काल्पनिक, सामाजिक अशा विविध विषयांवरील नाटकांचे घोडे गणेशोत्सवात चौखुर उधळलेले असत. कवी झेंडा, मुरारी शिवलकर, नागेश जोशी, विनायक पाटील यासारखे नाटककार, भाई सावंत, वसंत भोवर, खानविलकर यासारखे नाटय़ दिग्दर्शक, जगन्नाथ कांदळगावकर, बाळधुरी कृष्णकांत दळवी, दशरथ वाणी यासारखे नट गणेशोत्सवातील नाटकांमधूनच नावारूपाला आले. मंदा देसाई, शालिनी सावंत, संजीवनी जाधव, जयश्री शेजवाडकर यांसारख्या अभिनेत्री याच गणेशोत्सवातून पुढे आल्या. एकूणच गिरणगाव आणि गणेशोत्सव यांचे नाते अतूट होते. ‘मराठी बाणा’कार अशोक हांडे, भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी, देवदत्त साबळे, चारुशीला साबळे ही त्यावेळची तरुणाई गणेशोत्सवातल्या कार्यक्रमातून हुंदडत असे. आता गिरणगावातल्या गणेशोत्सवाने कूस बदलली आहे. तो दिवसेंदिवस अधिकाधिक हायटेक, तंत्रस्नेही, माध्यममित्र झाला आहे. प्रकाश झोतातल्या या गणेशोत्सवाने आपल्या मंडपातील समईचा मंगल, प्रसन्न प्रकाश टिकवायला हवा. गिरणगावाचे सत्त्व आणि स्वत्व म्हणजे तिथला गणेशोत्सव. त्याचे चिंतन करूया!

(लेखक ज्येष्ठ लोककला अभ्यासक आहेत)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या