शारदाश्रम विद्यामंदिरच्या मुली अजिंक्य ; शालेय संघटनेची मनोरमाबाई आपटे स्पर्धा जिंकली

इरा जाधवने 59 चेंडूंत 20 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी करत ठोकलेल्या तडाखेबंद 119 धावांच्या खेळीच्या जोरावर शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश माध्यमाच्या मुलींनी ठाण्याच्या वसंत विहार हायस्कूलचा 138 धावांनी धुव्वा उडवला आणि मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या 16 वर्षाखालील मुलींच्या मनोरमाबाई आपटे क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली.

मरीन लाइन्स पारसी जिमखान्यावर झालेल्या अंतिम लढतीत शारदाश्रमने इरा जाधव आणि सारथी भाकरे (56) यांनी दुसऱया विकेटसाठी 97 चेंडूंत केलेल्या 185 धावांच्या भागीमुळेच 20 षटकांत 6 बाद 210 धावा केल्या होत्या. तर 211 धावांचा पाठलाग करणाऱया वसंत विहारला प्रिशा देवरुखकर (5 धावांत 2 विकेट), मुग्धा पार्टे (4 धावांत 2बळी) आणि मधुरा धडके ( 15 धावांत 2 बळी) या तिघींच्या प्रभावी गोलंदाजीने 72 धावांतच गुंडाळले. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा माजी कसोटीपटू जयंतीलाल केनिया, एमसीएचे अभय हडप आणि शालेय संघटनेचे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांच्या उपस्थितीत पार पडला.