बयावांच्या स्टुडिओवर धाड का नाही टाकली : चोडणकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी 

राफेल क्लिपवरुन काल दिल्लीपासून गोव्यापर्यंत उठलेले वादळ आज थंडावले. काँग्रेसने मात्र हा विषय धगधगत राहील याची खबरदारी घेत भाजपला जर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप सिद्धनाथ बुयाव यांच्या स्टूडिओत बनववली गेल्याचा संशय आहे तर त्यांच्या स्टूडिओवर 24 तास उलटून गेले तरी धाड का नाही टाकली,असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

राफेल क्लिपवरुन आज भाजपच्या वतीने कोणतीही प्रतक्रिया आली नाही. काल क्लिपवरुन गदारोळ झाल्यानंतर विश्वजीत राणे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आपले वडील प्रतापसिंह राणे यांच्या सोबत जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची त्यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी जाऊन भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर पर्रिकर यांनी आपली प्रतिक्रिया ट्वीट करून व्यक्त करताना काँग्रेस वैफल्यग्रस्त झाल्याने हे प्रकार करत असल्याची टीका केली होती.

गुरूवारी काँग्रेसने भाजपच्या वतीने वीजमंत्री निलेश काब्राल आणि नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या प्रतिक्रियेवर धागा पकडुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काब्राल यांनी काल राफेल क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही क्लिप गिरीश चोडणकर यांच्या इशाऱ्यावर प्रवक्ते सिद्धनाथ बुयाव यांनी आपल्या स्टूडिओत बनवली गेली असल्याचा संशय व्यक्त केला होता. जर क्लिप बुयाव यांच्या स्टूडिओत बनवल्याचा संशय आहे तर सत्तेत असलेला भाजप कसली वाट बघत आहे. 24 तास उलटून गेले तरी बुयाव यांच्या स्टूडिओवर धाड टाकून आवश्यक ते पुरावे गोळा का केले नाही, असा थेट प्रश्न चोडणकर यांनी उपस्थित केला आहे.

चोडणकर म्हणाले, “राफेल क्लिपवरुन महत्वाचे सत्य समोर आले आहे. आता भाजपला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. विश्वजीत राणे यांनी या क्लिपची चौकशी करण्याचे पत्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांना पाठवून भाजपची अडचण आणखीनच वाढवली आहे. शहा हे सीबीआय प्रमुख नाही किंवा गृहमंत्री देखील नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पत्र पाठवण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र देशातील तपास यंत्रणा शहा यांच्या इशाऱ्यावर चालतात हे दाखवुन देण्याचे काम देखील राणे यांनी केले आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चोडणकर म्हणाले, 56 इंचाची छाती असलेले मोदी गेले 11 महिने आजारी असल्याने राज्यकारभार सांभाळू शकत नसलेल्या मुख्यमंत्री पर्रिकर यांना हटवू शकत नाही. आजारी असल्याने मोदी यांनी अरुण जेटली, सुषमा स्वराज, अनंत कुमार सारख्या कॅबिनेट मंत्र्यांच्या जागी दुसऱ्या मंत्र्यांची वर्णी लावली होती. गोव्यात मात्र 25-30 खाती घेऊन बसलेल्या पर्रिकर यांना हटवुन अन्य कोणाकडे नेतृत्व सोपवण्याची हिम्मत मोदी दाखवत नाही, कारण पर्रिकर यांच्याकडे राफेल डीलच्या महत्वाच्या फाइल्स आहेत.

राफेल क्लिपवरुन विश्वजीत राणे यांनी पोलिसांत तक्रार करण्या ऐवजी मुख्यमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून केलेली चौकशीची मागणी एकूणच प्रकरणा बाबत असलेला संशय वाढवणारी ठरत आहे. क्लिप खरोखरच राणे यांची असल्याचे सिद्ध झाल्यास राणे यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला जाईल एवढे मात्र निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.