दोन लाखांचा गोवा गुटखा पकडला, आरोपी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

जालना जिल्ह्यातील व परतूर तालुक्यातील आष्टी येथे एका घरामध्ये प्रतिबंधीत असलेला गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेला दोन लाख रुपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करुन आरोपीला गजाआड केले आहे. ही कारवाई आज १९ मार्च रोजी करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत परतुर तालुक्यातील आष्टी येथील एका घरामध्ये गोवा गुटखा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेला आहे. अशी माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन गुटखा विक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने आज १९ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आष्टी येथील जायकवाडी कॅम्प येथे घरात छापा मारला त्या ठिकाणी आरोपी शेख मोहम्मद शेख महेबुब रा. जायकवाडी कॅम्प आष्टी हा मिळून आला. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरामध्ये १२ गोण्यामध्ये गोवा गुटखा ज्याची किंमत २ लाख रुपये असा मिळून आला. सदर प्रतिबंधीत गोवा गुटखा हा त्याच्या मालकीचा असून त्याने तो त्याच्या किराणा दुकानामध्ये विक्री करण्यासाठी आणला होता, अशी कबुली दिली. त्याच्या ताब्यातील २ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन आरोपी शेख मोहम्मद शेख महेबुब याला ताब्यात घेण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ भिसे, संजय मगरे, रंजित वैराळ, किरण मोरे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, आशा जायभाये यांनी केली आहे.