
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा धोकादायक गोखले ब्रिज बंद केल्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. गोखले ब्रिजसाठी पर्यायी सहा मार्ग दिले असले तरी या मार्गांवरही रखडपट्टी होत असल्याने वाहतूकदार चांगलेच हैराण होत आहेत. त्यामुळे गोखले ब्रिज तोडण्याचे काम होईपर्यंत रिक्षा, छोटी वाहने आणि दुचाकींसाठी सुरू करता येईल का, याबाबत पालिका विचार करीत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने आज ‘आयआयटी, मुंबई’ला सुरक्षेबाबत अहवाल देण्यासाठी पत्र दिले आहे. आठवडाभरात याचे सकारात्मक उत्तर आल्यास रिक्षा, दुचाकींसाठी हा पूल सुरू करण्याबाबत विचार करता येईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल 1975 मध्ये बांधण्यात आला आहे. हा पूल 3 जुलै 2018 रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपल्या हद्दीमधील पुलाचे नव्याने बांधकाम एप्रिलपासून सुरू केले आहे. मात्र रेल्वे हद्दीमधील धोकादायक झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा भागही पाडण्यात येणार आहे. यासाठी 7 नोव्हेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वे हद्दीमधील धोकादायक भाग रेल्वेकडून पाडण्यात आल्यानंतर पालिकेकडून गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. मात्र पूल बंद करण्यात आल्यामुळे अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूककाsंडी होत आहे. त्यामुळे गोखले ब्रिज पाडेपर्यंत छोटय़ा वाहनांसाठी एक लेन सुरू करता येईल का, याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. दरम्यान, या पुलाचे बांधकाम रेल्वेकडून पाडण्यात येणार असून यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत, तर हा पूल पाडल्यानंतर पालिकेकडून नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी पालिका 84.72 कोटींचा खर्च करणार आहे. मे 2023 पर्यंत पुलाची एक लेन सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे.
‘व्हीजेटीआय’नेही सुचवले उपाय
अंधेरीत एस. व्ही. रोडसह लिंक रोडवर नेहमीच होणाऱ्या वाहतूककोंडीचा विचार करता अंधेरी पश्चिम येथील वर्सेवा, चार बंगला, सात बंगला, यारी रोड, डी. एन. नगर, स्वामी समर्थ नगर, जुहू आदी परिसरांतून पश्चिम द्रुतगती मार्गे बोरिवली व दक्षिण मुंबईत जाण्यासाठी गोखले पूल हा सर्वात जवळचा मार्ग ठरतो.
त्यामुळे या पुलावरून दररोज किमान दहा ते बारा हजार वाहनांची ये-जा होते, मात्र हा पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अंधेरी परिसरात होणारी वाहतूककाsंडी सोडवण्यासाठी माटुंग्याच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ुटनेही छोटय़ा वाहनांसाठी हा सुरू कसा करता येईल, याबाबत पालिकेला उपाय सुचवले आहेत.

























































