
सोनं म्हणजे हिंदुस्थानी महिलांचा जीव की प्राण. अडीअडचणीला कामी यावे म्हणून आजही लोक सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. परंतु सोन्याच्या दराने गेल्या काही वर्षांमध्ये आसमान गाठले आहे. मात्र आता खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आली असून सोन्याचा दर बऱ्याच कालावधीनंतर 50 हजारांच्याही खाली आला आहे.
शेअर मार्केटमध्ये आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. गुरुवारी दिल्लीमध्ये सोन्याचा दरामध्ये प्रति 10 ग्रॅममागे 478 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एक तोळा सोन्याचा दर 49 हजार 830 रुपयांवर आला आहे.
बुधवारी सोन्याचा दर 50 हजार 308 रुपयांवर पोहोचला होता. मात्र गुरुवारी त्यात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याचा दर 1 हजार 689 डॉलर प्रति औस सुरू आहे. डॉलरच्या मजबुतीमुळे आणि शेअर मार्केटमधील तेजीमुळे सोन्याच्या किंमती कमी होत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
मदीतही सोने स्वस्त
संपूर्ण जगामध्ये सध्या आर्थिक मंदीचे वारे वाहत आहेत. मंदीचे वातावरण असतानाही सोने स्वस्त झाले आहे. साधारणत: असे होत नाही. कार मंदी आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये सोन्याच्या किंमती वाढतात. परंतु सोने स्वस्त होण्याचे यंदा वेगळे कारण आहे. अमेरिकेमध्ये ट्रेझरी यील्ड वाढवल्याने आणि डॉलर मजबूत झाल्याने असे होत आहे.
चांदीची चमकही फिकी
सोन्यासोबत सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुसरा धातू म्हणजे चांदी. चांदीच्या दागिन्यांनाही बाजारामध्ये चांगली मागणी असते. सोन्यासोबत चांदीच्याही किंमती कमी झाल्या आहेत. गुरुवारी चांदीचा दर प्रति किलोमागे 1 हजार 265 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 54 हजार 351 रुपयांवर आला.




























































