सुरक्षा रक्षकाला ठार करण्याची धमकी, गोल्डन बाबा पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । प्रयागराज

अंगावर 20 किलो वजनाचे सोन्याचे दागिने परिधान केलेला आणि नेहमी वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध असलेला गोल्डन बाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या सरकारी सुरक्षारक्षकाला धमकावल्याप्रकरणी गोल्डन बाबा विरोधात गुन्हा दाखल झाला असून शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोल्डन बाबाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कॉन्सटेबल सतीश कुमार याने बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील कुंभ मेळ्यात सतीश कुमार बाबाच्या सुरक्षेसाठी तैनात होता. यावेळी गोल्डन बाबा परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास निघाले, त्यामुळे सतीशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यावेळी बाबाने सतिशला शिविगाळ करून धमकावले. तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सतीश घाबरून त्यांच्यासोबत गेला. मात्र बाबा पुन्हा परस्पर दुसऱ्या राज्यात जाण्यास निघाल्याने सतीशने याबाबत वरिष्ठांना सांगून कुंभमेळ्यात परतला. गोल्डनबाबाने परत आल्यावर पुन्हा शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सतीशने केला आहे. या प्रकरणी गोल्डन बाबाविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी त्यांना शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे या कुंभ मेळ्यात गोल्डन बाबाने अनेक वाद अंगावर ओढवून घेतले आहेत. सुरुवातीला कुंभमेळ्यात स्वात:च्या इच्छेप्रमाणे जागा मिळाली नाही म्हणून बाबाने अकांडतांडव केला. नंतर जुना अखाड्यातील झालेल्या वादामुळे त्यांची हकालपट्टी केली. यावेळी जुन्या आखाड्यातील पदाधिकाऱ्यांविरोधात त्यांनी केलेली तक्रार देखील पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे गोल्डन बाबाला प्रयागराज आखाड्यात अद्याप जागा मिळालेली नाही.