
द्राक्षांची पंढरी समजल्या जाणाऱया सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज पूर्व भाग अशा परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्षाच्या प्रतवारीला बसणार आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनाही आर्थिक फटका बसण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक द्राक्षबागांवर डाऊनी, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
सध्या द्राक्षबागा फुलोऱयाच्या अवस्थेत, तर काही डिपिंग देण्याच्या अवस्थेत आहेत. या द्राक्षबागांना ढगाळ हवामानाचा व अवकाळी पाऊस पडला, तर जबर फटका बसू शकतो. काही द्राक्षबागा या फ्लोअरिंग स्टेजला आहेत, तर काही द्राक्षबागा या वांझ काढण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच यावर्षी या परिसरातील द्राक्षबागांना फळ कमी आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्या धक्क्यातून तो सावरतो न सावरतो तोच गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
द्राक्ष उत्पादक हे औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही तासगाव तालुक्यातील पेड, मांजर्डे, हातनूर या परिसरातील अनेक द्राक्षबागांवर डाऊनी, भुरी यासारख्या भयंकर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी अनेक द्राक्षबागायतदार करीत आहेत.




























































