
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेडमध्ये अवयवदानाची चळवळ गतीमान होत असल्याचे दिसून येत असून, आज पुन्हा नांदेड शहरात चौथ्यांदा ग्रीन कॉरीडोअर करण्यात आला. ब्रेनडेड झालेल्या रुग्णांचे अवयव संभाजीनगर आणि मुंबई येथे पाठविण्यात आले. मुंबई येथे विमानाने तर संभाजीनगर येथे रुग्णवाहिकेव्दारे अवयव पाठविण्यात आले. ग्रीन कॉरीडोअरच्या माध्यमातून केवळ पाच मिनिटात अवयव विमानतळ येथे पोहचविण्यात आले.
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील भुजंग गोरखनाथ मस्के हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या बासलेगाव येथील मंदिराच्या रंगरंगोटीसाठी गेले होते. दि.२६ नोव्हेंबरच्या दुपारी रंगरंगोटीचे काम करत असताना ते तोल जावून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सोलापूर येथे काही दिवस उपचार करुन त्यांना नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरु असताना दि.४ डिसेंबर रोजी त्यांचा ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉ.त्र्यंबक दापकेकर यांच्या माध्यमातून नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ हे अंतर ग्रीन कॉरीडोअरच्या माध्यमातून केवळ पाच मिनिटांच्या आत पार करण्यात आले. रुग्णाची किडनी संभाजीनगर आणि नांदेड, डोळे नांदेड तर हृदय मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल आणि लिव्हर चेन्नई येथे पाठविण्यात आले आहे. संभाजीनगर येथे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून किडनी पाठविण्यात आली तर हृदय आणि लिव्हर एअर अंबुलन्सच्या माध्यमातून पाठविण्यात आले.
शहरात आज चौथ्यांदा ग्रीन कॉरीडोअर असल्याने वाहन धारकांनीही या ग्रीन कॉरीडोअरला प्रतिसाद दिला. अनेक जण स्वतः रस्त्यावरील वाहने बाजूला करताना दिसून आले. नांदेडमध्ये अवयवदानाची चळवळ गती घेत असून आज चौथ्यांदा झालेले ग्रीन कॉरीडोअर हे त्याचे ताजे उदाहरण आहे.




























































