वेधक – नवरदेवाचे अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग पोतदार

लग्न म्हटलं की थाटमाट, खर्च, भेटवस्तू आणि सोशल मीडियावर झळकणारे क्षण… पण नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबाने या सगळ्या चौकटी मोडून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात नवरदेव सिद्धेश्वर पेठकर यांनी आपल्या लग्नानिमित्त संपूर्ण गावालाच अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’ दिले. पाहुण्यांना भेटवस्तू देण्याऐवजी त्यांनी गावातील 3,465 नागरिकांचा प्रत्येकी 1 लाख रुपयांचा अपघात विमा उतरवत तब्बल 33.6 कोटी रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले.

20 मे रोजी संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची वेगळीच किनार लाभली. सिद्धेश्वर पेठकर आणि त्यांचे मोठे बंधू अनुप पेठकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. लग्नाच्या आनंदात गावालाही सहभागी करून घेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलण्याचा निर्णय पेठकर कुटुंबाने घेतला. या उपक्रमांतर्गत गावातील एकही पात्र नागरिक वंचित राहू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या नावाने ग्रुप विमा पॉलिसी घेण्यात आली आणि मतदार यादीच्या आधारे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखली गेली.

याबाबत बोलताना नवरदेव सिद्धेश्वर पेठकर म्हणाले, ‘आपल्या संस्कृतीत केलेल्या दानाचा गाजावाजा करण्याची परंपरा नाही. प्रसिद्धी किंवा कौतुक मिळवणे हा आमचा हेतू नाही. आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून गावकऱ्यांचे भले व्हावे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत, एवढीच अपेक्षा.’ पेठकर कुटुंबाच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनीही मनापासून स्वागत केले. बहादरपुराचे सरपंच बळीराम पेठकर यांनी हे लग्न गावासाठी अविस्मरणीय ठरल्याचे सांगत, ‘लग्नात संपूर्ण गावाला अपघात विम्याचे संरक्षण मिळणे ही कदाचित पहिलीच ऐतिहासिक घटना असावी,’ अशी भावना व्यक्त केली.

आज अनेक ठिकाणी लग्न म्हणजे खर्च आणि दिखाव्याची स्पर्धा बनत चालली असताना नांदेडमधील या कुटुंबाने समाजहिताचा विचार करत वेगळी वाट निवडली. एका लग्नाला त्यांनी केवळ उत्सव न ठेवता सामाजिक सुरक्षिततेचे रूप दिले आणि खऱ्या अर्थाने ‘रिटर्न गिफ्ट’ची नवी व्याख्या घडवून आणली.