इम्रान प्रतापगढींची एमआयएमवर टीका, काँग्रेसच्या सभेमुळे गोध्रा येथे तणावाचे वातावरण

गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी हे गोधरा इथे आले होते. त्यांच्या सभेमध्ये जबरदस्त गोंधळ झाला, ज्यामुळे त्यांना सभेच्या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला. प्रतापगढी यांनी त्यांच्या भाषणामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षावर टीका केली होती. यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते बिथरले होते. या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची सभा सुरू असलेल्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात केली होती. काही मिनिटांमध्येच ज्या ठिकाणी ही सभा सुरू होती, तिथे परिस्थिती तणावग्रस्त बनली होती.

गोधरा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. इथे मुसलमानांची संख्या जास्त असल्याने एमआयएम आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद या मतदारसंघांत लावली आहे. इम्रान प्रतापगढी यांची बुधवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये त्यांनी एमआयएम आणि ओवैसी यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. ही टीका सहन न झाल्याने ओवैसी समर्थक आणि एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी जमले होते. यानंतर त्यांची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली आणि प्रकरण हातघाईवर पोहोचलं होतं. परिस्थिती चिघळलेली पाहून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रचापगढी यांना सभास्थळावरून सुखरूप बाहेर काढलं आणि तिथून रवाना करून दिलं.

गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक 2 टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यासाठीचं मतदार 1 डिसेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी होत आहे. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होणार असून या जागांसाठी एकूण 788 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गुजरातच्या निवडणुकीत प्रमुख लढत ही भाजप विरूद्ध काँग्रेस अशी मानली जात असली तरी आम आदमी पक्षानेही गुजरातेत जोरदार प्रचार करून या दोन्ही पक्षांसमोर एक आव्हान उभं केलं आहे.