गुजरातमध्ये आयाराम गयारामांचा सुळसुळाट, काँग्रेसमध्ये गेलेले भाजपचे सरपंच काही तासांतच पुन्हा स्वगृही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील धोराजी परिसरात गुरुवारी स्थानिक राजकारणात मोठा नाट्यमय घडामोडींचा दिवस ठरला. पाटनवाव गावचे सरपंच कानभाई सावळिया यांनी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काही तासांतच पुन्हा भारतीय जनता पक्षात (भाजप) ‘घरवापसी’ केली. अवघ्या काही तासांत घडलेल्या या राजकीय ‘यू-टर्न’मुळे धोराजी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळी सावळिया यांनी भाजपला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेसचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आणि ग्रामीण भागातील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती.

मात्र हा राजकीय बदल फार काळ टिकला नाही. दुपारनंतर काही तासांतच सावळिया यांनी आपल्या समर्थकांसह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा निर्णय पूर्णपणे स्वेच्छेने घेतल्याचे सांगितले. “हा निर्णय आम्ही स्वतःच्या विचाराने घेतला असून कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा बाहेरील दबाव नाही. मुख्य प्रवाहात राहणे आमच्यासाठी योग्य वाटले, त्यामुळे आम्ही परतलो,” असे सावळिया म्हणाले.

सकाळी काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या भेटीबाबत विचारले असता, त्यांनी त्या कार्यक्रमाला “फक्त औपचारिकता” असल्याचे सांगितले. दरम्यान, स्थानिक पातळीवर पक्षांतराची प्रकरणे सामान्य असली तरी अवघ्या आठ तासांत झालेला हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे.

धोराजीतील या घटनेपूर्वी भावनगरमध्येही असाच एक वेगवान राजकीय यू-टर्न पाहायला मिळाला होता. भाजपच्या माजी नगरसेविका सेजल बेन गोहिल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र अवघ्या तीन तासांत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परत येत माफी मागितली. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना गोहिल यांनी वैयक्तिक सुरक्षेची चिंता आणि पक्षाकडून पाठिंबा मिळत नसल्याचे कारण दिले होते. मात्र काही तासांतच त्या भाजप कार्यालयात दाखल झाल्या आणि आपण “गैरसमजाला बळी पडलो” असे सांगत हा निर्णय चूक असल्याचे मान्य केले.

आता गोहिल यांनी भाजपशी आजीवन निष्ठा असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, भावनगर शहर काँग्रेस अध्यक्ष मनोहरसिंह गोहिल यांनी दावा केला की, सेजल बेन काही महिन्यांपासून पक्षांतराच्या चर्चेत होत्या आणि त्यांची अचानक परतफेरी ही बाहेरील दबावामुळे झाली असावी.

राजकीय चर्चांना उधाण
धोराजी आणि भावनगरमधील या दोन घटनांमुळे गुजरातमधील स्थानिक राजकारणात पक्षांतर, दबाव आणि राजकीय निष्ठा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः काही तासांतच घेतलेले असे निर्णय राजकीय वातावरणातील अस्थिरता आणि पडद्यामागील घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.