महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील 124 पदे तातडीने भरणार – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील 124 पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात मजिप्रा मध्ये 26 ऑक्टोबर 1994 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट-क आणि गट-ड या वर्गवारीतील कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत घेण्यात येत होते. 2000 सालापर्यंत ही अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रणाली सुरू होती. तथापि, राज्य शासनाने १ मार्च 2000 रोजीच्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, मृत्यू वा राजीनामा आदींमुळे रिक्त होणार्‍या जागांवर पदे भरण्यास बंदी घातली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही यानुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला स्थगिती दिली होती. यानंतर, 22 ऑगस्ट 2005 च्या शासकीय निर्णयानुसार प्रति वर्षी रिक्त होणार्‍या पदांमधील प्रतीक्षा यादीतील 5 टक्के लोकांची पदे भरण्याला मान्यता मिळाली. तर 1 मार्च 2014 च्या निर्णयानुसार ही मर्यादा वाढवून 10 टक्के इतकी करण्यात आली.

आर्थिक स्थिती नाजूक असल्याने व काही वर्गवारीतील अतिरिक्त पदे बाद झाल्याने मजिप्रा मध्ये 2000 नंतर अनुकंपा तत्वावरील भरतीला ब्रेक लागला होता. दरम्यान, 23 ऑगस्ट 2016 रोजी मजिप्राच्या झालेल्या बैठकीनुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला मान्यता देण्यात आली. यानुसार 2016 साली 11 तर 2018 व 2019 साली प्रत्येकी 15 पदे भरण्यात आली.

दरम्यान, 11/9/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 20 टक्के पदे विचारात घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यातील आधीची 15 पदे वगळता आता एकूण 124 पदांची भरती करण्यात येणार आहे. यात ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर परिमंडळातील पदांवर अनुकंपा तत्वधारकांना नियुक्ती देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे विभागाला निर्देश दिले आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतल्याने 124 अनुकंप धारकांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असणार्‍यांना आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरणात नियुक्ती मिळणार आहे. यामुळे त्यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होणार असून याचे श्रेय गुलाबराव पाटील यांना जाते.

आपली प्रतिक्रिया द्या