
सामना प्रतिनिधी । जळगाव
जळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर आज सकाळी 10.30 वाजता भरदिवसा मोटारसायकल वरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडली. संतोष पाटील यांच्या छातीत गोळी घुसली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहर हादरले आहे.
संतोष पाटील हे गिरणा नदीकडे शेतात जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. संतोष पाटील यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. संतोष पाटील यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत. पोलिसांना घटनास्थळी दुचाकी, पिस्तुलच्या तीन बुलेट्स आढळून आल्या आहेत. यापैकी एक भरलेली, तर दोन रिकाम्या आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हल्लेखोर पोद्दार शाळेच्या दिशेने पळून गेला. त्याने तोंडावर रुमाल बांधला होता आणि अंगात जॅकेट घातले होते. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.




























































