
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळा धंदा सुरू आहे, गांजा विकला जातो, हातभट्टय़ा व विषारी दारूने थैमान घातले आहे. राज्याचा गृह विभाग ‘पांडू हवालदार’ चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही माजली आहे, अशी टीका कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पुण्यात विषारी दारूने 22 निष्पाप लोकांचे बळी गेल्यानंतर सरकारला जाग आली असून हातभट्टय़ा तोडण्याची कारवाई केली जात आहे. राज्यात अवैध धंदे व हातभट्टय़ा राजरोस सुरू आहेत. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
गुजरातचे महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, जामतारासारखे प्रकरण व अवैध धंद्याचे रॅकेट राजरोस सुरू असून त्याला गृह विभागाचा आशीर्वाद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्यच बदलले आहे. पुण्यातील प्रकरणाने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असल्याने स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी आता कारवाईचे नाटक केले जात आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.


























































