
शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मागे घेण्यासाठी शिरोमणी अकाली दलाने अपार संघर्ष केला. त्यासाठीच एनडीएमधून बाहेर पडलो. आता आम्ही शेतकऱ्यांचा आवाज झालो आहोत. मोदी सरकारच्या शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध असेच लढत राहणार, असा इशारा अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब या गुरुद्वाराला भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कृषी कायद्याविरोधातील अकाली दलाची भूमिका स्पष्ट केली. अकाली दल कायमच शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने आहे. त्यासाठीच कृषी कायद्यांना विरोध दर्शवतच मंत्रीपदाचा राजीनामा देत मोदी सरकारसोबतचे सौहार्दाचे संबंध तोडून टाकल्याचे हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले. अकाली दल एनडीएतूनही बाहेर पडून शेतकऱ्यांचा आवाज झालाय, असे त्या म्हणाल्या.
























































