राजस्थानमधील सामूहिक बलात्कारावर मौन, हाथरस घटनेवर राहुल-प्रियांकाची नौटंकी! – रवीशंकर प्रसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांच्यावर केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी निशाणा साधला आहे. राजस्थानमध्ये अशाच प्रकारची घटना घडली असून त्यावर त्यांनी (राहुल-प्रियांका) मौन साधले, मात्र हाथरस घटनेवर नौटंकी सुरू आहे, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली. या प्रकरणात योगी सरकारने एसआयटी स्थापना केली असून आरोपींना अटक केली आहे, असेही ते म्हणाले. तसेच इशाऱ्या-इशाऱ्यात त्यांनी पीडितेवर बलात्कार झाला नाही, असेही म्हटले.

‘ही दुर्भाग्यपूर्ण घटना असून या प्रकरणी योगी सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. तसेच हे बलात्काराचे प्रकरण आहे अथवा नाही याबाबत यूपी पोलिसांनी याआधीच स्पष्ट केले आहे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले. गुरुवारीच यूपी पोलिसांनी पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती दिली होती. मात्र विरोधकांनी पोलिसांवर संशय व्यक्त करत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

राजस्थानवर मौन का?
राजस्थानमध्ये झालेल्या घटनेवर मौन राहण्यामागे काँग्रेसचा अजेंडा काय आहे? असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. राहुल आणि प्रियांका दोघेही या घटनेवर चुप्पी साधून आहेत, मात्र हाथरस घटनेवर नौटंकी सुरू आहे, असे ते म्हणाले.

‘आरोपींना असा दंड देईल की…’, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री योगींची प्रतिक्रिया