
अमित खोत । मालवण
मालवणात झालेल्या अतिवृष्टीने कहर माजवत रात्री मालवणवासीयांची झोप उडवली. दिव-रात्र कोसळणाऱ्या पावसाने मालवणात अनेक ठिकाणी पाणी भरले असतानाच रात्रीपासून पावसाने आणखी जोर धरल्याने पुरे मालवण जलमय झाले. सकाळ नंतर मात्र पावसाचा जोर ओसरला.
मुसळधार पावसामुळे मालवण बंदर जेटी नजीकच्या अगोस्तिन जॉन फर्नांडिस यांच्या घराच्या मागील बाजूच्या जुन्या मातीच्या भिंती मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली. या घराची देखभाल संपदा मालवणकर व नम्रता रामचंद्र माडये या करतात मात्र दुर्घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला. भिंती कोसळल्यामुळे घरातील विविध साहित्य त्याखाली गाडले गेल्याने सुमारे २ लाखांचे नुकसान झाले. धुरीवाडा येथील मिताली महेश मेस्त्री यांच्या घरात रात्री पाणी घुसून घरातील सर्वच खोल्या पाण्याने भरल्या. देवबाग येथेही पावसाच्या पाण्याने अनेक घरांना वेढा दिला. काही घरातही पाणी घुसले.
अतिवृष्टीमुळे मालवण बाजारपेठ जलमय झाली. तसेच गटारे तुंबल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. बाजारपेठेतील मालवणी बाजार या किराणा मालाच्या दुकानात रात्री मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने धान्यासह विविध किराणा माल भिजून खराब झाल्याने सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले. तर बाजारपेठेतील काही दुकाने व हॉटेल मध्येही पाणी शिरले.
तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. नांदोस येथील वसंत सुरबा गावडे यांच्या घरावर जांभळीचे झाड कोसळून घराच्या छप्पराचे सुमारे २००० हजार रुपयांचे नुकसान झाले.
देवली-आडारी मार्गावर दरड कोसळली
देवली मार्गावर डोंगराची माती रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प होती. सामाजिक कार्यकर्ते मंदार लुडबे, भाई मांजरेकर, छोटू सावजी, उपसरपंच भाऊ चव्हाण व अन्य ग्रामस्थांनी मदतकार्य करत माती हटवली. आडारी मार्गावरही डोंगराचे दगड रस्त्यावर कोसळले.




























































