
सामना ऑनलाईन, शिरोळ
शिरोशिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा आणि कुष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील राजापूर, शिरोळ, तेरवाड हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर श्री क्षेत्र नुसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पाणी शिरले असून या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी रात्री संपन्न झाला, तसेच औरवाड येथील जुना पूल आणि शिरढोन पूल पाण्याखाली गेल्यामुळे शिरढोन टाकवडे गावचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ४५ फूट तर कुष्णा १८ फूट इतकी आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिरोळ तालुक्यात गेले चार दिवस दमदार पाऊस सुरू आहे. दुपारनंतर काही वेळ पावसाने उघडीप दिला. मात्र सकाळी साडेनऊ आणि दुपारी साडेतीन वाजता दमदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील काही रस्त्यावर पाणी साचले. दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे रेनकोट आणि छत्री घेऊनच नागरिक बाहेर पडले. दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झाला. तालुक्यातील शिरोळ, राजापूर व तेरवाड हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले असून शिरोळ बंधाऱ्यांची पाणी पातळी ४५.६, राजापूर ३३ तर तेरवाड बंधाऱ्यांची पाणी पातळी ५४.६ इतकी आहे. तसेच तालुक्यात आज अखेर ८८३ मी मी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तालुक्यातील पंचगंगा आणि कुष्णा नदीच्या पातळीतही गेल्या २४ तासात ३ फुटांनी वाढ झाली आहे. तर औरवाड येथील जुना पूल आणि शिरढोन पूल पाण्याखाली गेल्या मुळे शिरढोन, टाकवडे गावांचा संपर्क तुटला आहे. तर हेरवाड-आ लाट दरम्यान असलेल्या ओढा आज रात्री पाण्याखाली जाण्याची शक्यता असून अब्दुललाट, शिरदवाड, शिवणाकवडी, लाटवाडी आदी गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. कुरुंदवाड येथील अनवडी नाला दोन दिवसांपूर्वी पाण्याखाली गेला आहे. संततधार पावसाने बळीराजा सुखावला आहे. पेरण्यांना वेग आला असून शेतीच्या कामाला गती आली आहे. मात्र नदीकाठच्या गवताच्या शेतीत पाणी शिरल्याने गवताचे नुकसान झाले आहे तर पाण्याच्या पतळी वाढतच असल्याने नदीकाठच्या पाण्याच्या मोटारी काढण्यात शेतकरी मग्न आहे. शिरोळ तहसील कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवली आहे.































































