वादळी वाऱ्यासह पावसाने वैजापूर, नेवरगावला झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वैजापूर/नेवरगाव

वैजापूर : शहरासह आसपासच्या परिसराला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. या घटनेत इंगळे वस्तीवर हाहाकार उडाला. वादळी वाऱ्याने ३ कोप्या, ४ घरांवरील पत्रे उडाली. अनेक झाडे उन्मळून पडली. गोठा पडल्याने ३ बकऱ्या, एका कुत्र्याचा मृत्यू झाला. अनेकांच्या शेतातील चारा उडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास वैजापूर शहर व परिसरात वादळवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ग्रामीण भागातसुद्धा पावसाच्या सरी कोसळल्याने पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यायांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणी झाले. सखल भागात पाणी साचल्याने पादचाऱ्यांची अडचण झाली.

नगिना पिंपळगाव, फकिराबादवाडी, म्हस्की, लाडगाव खंबाळा, किरतपूर, डवाळा या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. वैजापूर, श्रीरामपूर रस्त्यावर वैजापूर शिवारात दोन मोठी झाडे आडवी पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब व तारा जमिनीवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांच्या कांदाचाळी उडून गेल्याने साठवलेला कांदा भिजून नुकसान झाले. नगिना पिंपळगाव शिवारात कडू रामभाऊ गायकवाड यांची कांदाचाळ उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर याच भागात सिंगल फेज डीपीवर बाभळीचे झाड कोसळले.

वैजापूर शहरातील म्हस्की रोडवरील इंगळे वस्ती परिसरात दाणादाण उडाली. येथील मच्छिंद्र त्रिभुवन व मुरली त्रिभुवन यांच्या कोप्या पडल्या. बशीर खान यांच्या घराचे व गोठ्याची पत्रे उडून भिंती पडल्याने त्याखाली दबून ३ बकऱ्या व कुत्रा मरण पावला. तसेच कांदे पावसाच्या पाण्याने खराब झाले. सखाहारी इंगळे यांच्या जनावरांच्या गोठाची पत्रे उडाली. रामनाथ इंगळे यांच्या ट्रॅक्टरवर झाड पडले. तर आसाराम इंगळे यांच्या घरासमोरील झाड पडल्याने म्हस्की रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. विष्णू इंगळे यांच्या शेतातील चारा उडून गेला. दुर्गावाडीतील शेख रज्जाक यांचे घरावरील पत्रे उडून गेली. तसेच अनेक ठिकाणी झाडे पडली. सात जून रोजी शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात हलका पाऊस झाला होता. पण हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, हा पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर पाऊस कोसळल्याने शेतकरी आनंदित झाले असून, आणखी एखादा पाऊस पडल्यास पेरणीची लगबग सुरू होण्याची शक्यता आहे.

नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील नेवरगावसह परिसरातील अनेक गावांना मंगळवारी पावसासह वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली.अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आला. परंतु जोरदार वादळी वाऱ्याने नेवरगाव, ममदापूर, अगर कानडगावसह परिसरातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. घरातील धान्य त्याचबरोबर विद्युत उपकरणेदेखील जळाली. अनेक नागरिकही यात जखमी झाले. परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. बऱ्याच ठिकाणी विजेच्या तारा व खांबदेखील मोडून पडले. त्यामुळे कायगाव ते नेवरगाव रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होती. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वादळात ममदापूर येथील कचरू रणपिसे, निर्मलदास अल्हाट, अजय रणपिसे, यांच्या घरावरील पत्रे उडाली. तर उडालेल्या छतामुळे कचराबाई अल्हाट या जखमी झाल्या. अगर कानडगाव येथील सय्यद अख्तर आली यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने वऱ्हांडी कोसळून एक वासरू दगावले. तर राजू रणपिसे यांची शेळीही दगावली. नेवरगावात वच्छला बाबुराव नरवडे यांच्या दुकानांची पत्रे उडून पंचवीस क्विंटल गहू व तांदूळ भिजला. मुकेश गायकवाड, सविता गायकवाड यांच्या घरावरील पत्रे उडाली. वादळी वाऱ्याने नुकसान झाले असले, तरी उशिरा का होईना झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.