शिवा थापासह आठ हिंदुस्थानींचे पदक निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। हेलसिंकी

फिनलँड येथे सुरू असलेल्या 38 व्या आंतरराष्ट्रीय जीबी मुष्टियुद्ध स्पर्धेत तीनवेळचा आशियाई विजेता शिवा थापा (60 किलो) आणि माजी युवा विश्वविजेता सचिव सिवाच (52 किलो) यांच्यासह सहा हिंदुस्थानी बॉक्सर्सनी उपांत्य फेरी गाठून आपल्या पदकांची निश्चिती केली आहे. सुमित सांगवान (91 किलो) आणि गोविंद सहानी (49 किलो) यांनी अगोदरच आपापल्या गटात अंतिम 4 मुष्टियोद्धय़ांमध्ये स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत 15 देशांचे 100 मुष्टियोद्धे सहभागी झाले आहेत.

माजी विश्व अजिंक्यपद कास्यपदक विजेत्या थापाने पोलंडच्या डॉमिनिक पलकचा उपांत्यपूर्व फेरीत 5-0 असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याची रशियाच्या मिखाईल व्हार्लामोव्हशी गाठ पडणार आहे. त्याचप्रमाणे सिवाचने रशियाच्या तामीर गालानोव्हला 4-1 असे पराभूत केले. त्याची उपांत्य फेरीत किरगिजस्तानच्या अझत उसेनोलिव्हशी लढत होईल.

थापा, सिवाच यांच्यापाठोपाठ राष्ट्रकुल कास्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीन (56 किलो), कवींदरसिंग बिश्त (56 किलो), दिनेशा डागर (69 किलो) आणि नवीन कुमार (91 किलोवरील) यांनीदेखील उपांत्य फेरीतील स्थान पक्के करीत देशासाठी पदक आणण्याची निश्चिती केली आहे.