
मधुकर ठाकूर । उरण
रायगड जिल्ह्यात आरोग्य सेवा कोलमडली असून त्यास जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई कारणीभूत आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. मनमानी कारभारामुळे आरोग्य सेवेचे नुकसान होत असून त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हा आरोग्य समिती सदस्य विजय भोईर यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव यांच्याकडे लेखी तक्रारीव्दारे केली आहे. आरोग्य समितीचे आणि जिल्हा परिषद सदस्यांनीच केलेल्या गंभीर तक्रारीमुळे जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
रायगड जिल्हयामध्ये बऱ्याच ठिकाणी साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. त्याच्यावर जिल्ह्याच्या प्रत्येक महीन्याला होणाऱ्या आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा करणे अपेक्षित असते. त्यावर आढावा सभेमध्ये जिल्ह्यातील साथरोग असो वा अन्य आरोग्य विषयावर चर्चा करण्याची अपेक्षित असते. शासनाचे आरोग्य विषयक धोरण राबविणे, संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी व लोक प्रतिनिधि यांच्या संगनमताने हे कार्य पुढे नेणे अपेक्षित असते. मात्र रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई आपल्या पदाचा जाणून बुजुन दुरुपयोग करत असून लोकप्रतिनिधींना आरोग्य समिती पासून दूर कसे ठेवता येईल याची ते कटाक्षाने काळजी घेतात. रायगड जिल्ह्याच्या आरोग्य समितीचे सभेचे निमंत्रण लोकप्रतिनिधि यांना वेळेवर मिळत नाही. शिवाय त्यांच्याच मर्जीतील सदस्यांच्या संगनमताने विविध सभा घेणे चालू आहे. हे सर्व उद्योग सचिन देसाई यांच्या माध्यमातून सुरु आहे. याचेच एक जीवंत उदाहरण म्हणजे ६ आँक्टोंबर रोजी आरोग्य समितीची सभा फोन वरुन कळवून रद्द केली. त्याचे कारण सांगितले की, आरोग्य शिबीर आहे. आरोग्य शिबीर घेण्याची तारीख माहित होती तर तिथे सभा का लावली? हा मोठा संशयाचा प्रश्न आहे. रद्द झालेली सभा २६ आँक्टोंबर रोजी लोकप्रतिनिधींना सभेचे लेखी निमंत्रण न पाठविता सभा संपन्न झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न,समस्यावर या सभेत चर्चा करायला मिळाली नसल्याचा गंभीर आरोपही सेनेचे राजिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी तक्रारीतून केला आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्या अशा वृत्तीने रायगड जिल्हयामध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून जिल्ह्यातील रुग्ण सेवेवर परिणाम झाल्याने आज बऱ्याच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी जागेवर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला सर्वस्वी रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई जबाबदार आहेत. सखोल चौकशी केल्यास यातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणेही बाहेर येतील अशी शक्यताही तक्रारीतुन भोईर यांनी व्यक्त केली आहे.
अशा या हलगर्जी व उर्मट अधिकाऱ्यांविरुद्ध शासन स्तरावरुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे लेखी तक्रार सचिवांना देउन अधिकारी डॉ सचिन देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तथा रायगड जिल्हा आरोग्य समिती सदस्य विजय भोईर यांनी केली आहे. आरोग्य समितीचे आणि जिल्हा परिषद सदस्यांनीच केलेल्या गंभीर तक्रारीमुळे जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

































































