हिंदुस्थानी भाऊविरुद्ध फेक व्हिडीओ व्हायरल, पत्नीची पोलिसात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहले फुरसतें निकल, असं म्हणत सोशल मीडियावर तुफान गाजलेला हिंदुस्थानी भाऊ बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्येही चांगलीच लोकप्रियता मिळवत आहे. त्याच्या येण्याने बिग बॉसमध्ये आता चांगलीच रंगत आल्याने त्याचे चाहतेही खूश आहेत. पण, हिंदुस्थानी भाऊचे कुटुंबीय मात्र या अनुषंगाने व्हायरल होणाऱ्या फेक व्हिडीओमुळे चांगलेच हैराण झाले असून त्याविरोधात हिंदुस्थानी भाऊच्या पत्नीने पोलिसात तक्रारही केली आहे.

हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विकास पाठक असं आहे. हिंदुस्थानी भाऊ हा प्रसिद्ध युट्युबर असून त्याचे युट्युबवर 9 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हिंदुस्थानविरोधात गरळ ओकणाऱ्यांचा हिंदुस्थानी भाऊ समाचार घेत असतो. देशाविरोधात बोलणाऱ्या तिथल्या नेटीझन्सना तो शिव्या देत राहतो. त्यामुळेच त्याला बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्येही आमंत्रित करण्यात आलं. तिथेही तो लोकप्रिय ठरताना दिसत आहे. बिग बॉसच्या सीझनमध्ये गेलेल्या हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात काही फेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओंच्या विरोधात विकास याची पत्नी अश्विनी हिने खार पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

hindustani-bhau-wife-letter

या तक्रारीत नमूद केल्यानुसार, गेला काही काळ हिंदुस्थानी भाऊविरुद्ध काही चुकीचे संदेश आणि व्हिडीओ पसरवले जात आहेत. या मध्ये हिंदुस्थानी भाऊचे नकली कुटुंबीय बनूनही काही जण व्हिडीओ पसरवत आहेत. त्यामुळे नाहक वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली आई, वडील, मुलगा, सासू, आपण स्वतः आणि हिंदुस्थानी भाऊचा पुतण्या यांव्यतिरिक्त कोणीही त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक नाहीत. जर अशा प्रकारे कुणी दिशाभूल करत असेल, तर त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. हे प्रकार थांबवण्यात यावेत, तसंच अशा प्रकारे कोणत्याही व्हिडीओमुळे वाद ओढवू नयेत, यासाठी ही तक्रार केल्याचं अश्विनी यांनी नमूद केलं आहे.