
सातारा जिल्ह्यात सर्वांत जास्त पाटण तालुक्यासह कराड तालुक्यातील सुपने मंडलाला प्रत्येक वर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो. तालुका प्रशासनाला आपत्तीची कल्पना आहे. आपत्ती आल्यानंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी प्रतिवर्षी नियोजनाची बैठक घेतली जाते. यावर्षी प्रशासनाने आपत्तीच्या काळात हलगर्जीपणा न करता अगोदरच सावध राहून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.
शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, कराडचे उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, तहसीलदार रमेश पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता एन. टी. पोतदार, कार्यकारी अभियंता बुंदिले, कराडचे गटविकास अधिकारी यू. व्ही. साळुंखे, पोलीस निरीक्षक एन. चौखंडे, उंब्रजचे अजय गोरड, मल्हार पेठचे उत्तम भापकर, संतोष पवार, कृषी अधिकारी सुनील ताकटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डा. प्रमोद खराडे, पाटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसीलदार प्रशांत थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
शंभूराज देसाई यांनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱयांकडून मान्सून काळात कोयना धरणात होणाऱया पाणीसाठय़ासंदर्भात व पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर पाणी विर्सगासंदर्भात माहिती घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे, असे सांगितले. तसेच, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तहसील कार्यालयात 24 तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात यावा. आपत्तीकाळात अडचण निर्माण झाल्यास तत्काळ तोडगा काढण्यासाठी नियोजन करावे तसेच प्रत्येक तालुकास्तरीय अधिकाऱयांनी आपल्या विभागात 1 जूनपासूनच आपत्कालीन कामासाठी अधिकारी, कर्मचाऱयांची नेमणूक करून त्यांचे मोबाईल नंबर ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करावेत. तलाठय़ांमार्फत कोयनाकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना कराव्यात तसेच मान्सून काळात साथीचे रोग पसरणार नाहीत, यासाठी उपायोजना कराव्यात, पावसाळ्यामध्ये ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये साथीच्या रोगांबरोबर सर्पदंशाचे प्रमाण मोठे असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा आताच करून ठेवावा, अशा सूचना शंभूराज देसाई यांनी दिल्या.
विद्युत विभागाने आपत्कालीन टीम तयार करावी
– विद्युत विभागाने आपत्कालीन टीम तयार करून विद्युत पुरवठा सुरळीत कसा राहील, याची दक्षता घ्यावी. प्राथमिक शाळांच्या वीजजोडण्या चालू आहेत का ते पाहावे. अतिवृष्टीच्या काळात रस्ता बंद होऊन दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जेसीबी मशीन व पोकलॅन मशीन उपलब्ध कराव्यात व आपली यंत्रणा सतर्क ठेवावी, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या
पाटणमधील अतिक्रमणांवर कारवाई करा
– पाटणमधील अतिक्रमणांमुळे उद्भवणाऱया पूरस्थितीबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना पाटण नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱयांना करण्यात आल्या. कराड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असून, त्याठिकाणी दक्षता फलक लावण्याचे काम करावे, असेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.
































































