
घरांच्या किमती सातत्याने वाढत असताना 2020 सालामध्ये मुंबईत आलिशान घरे घेणाऱयांना थोडा दिलासा मिळणार आहे. नाइट फ्रँकने नुकताच नववर्षातील निवासी मालमत्तांच्या किमतीतील अपेक्षित वाढीचा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये मुंबई शहर सातव्या स्थानावर आहे. अन्य आंतरराष्ट्रीय शहरांच्या तुलनेत मुंबईत आलिशान घरांच्या किमती वाढणार नाहीत. उलट वांद्रे उपनगरासारख्या काही ठिकाणी घरांच्या किंमती 1 टक्क्याने कमी होणार आहेत.
नाइट फ्रँक ही आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार कंपनी आहे. नाईट फ्रँकतर्फे विविध शहरांतील घरांच्या किमतीसंदर्भात अहवाल प्रसिद्ध केले जातात. यावेळी आर्थिक स्थिती, पुरवठा, मागणी आणि विक्रीचा कल यांच्या आधारावर विश्लेषकांनी नववर्षांची अपेक्षित दरवाढ निश्चित केली आहे. या ताज्या अहवालानुसार, घर खरेदीच्या बाबतीत मुंबईकर सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. नवीन वर्षांत आलिशान घरे घेणाऱयांना थोडा दिलासा मिळणार आहे. कफ परेड, नेपियन्सी रोड, कुलाबा, लोअर परळ, वरळी, ताडदेव, जुहू, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, सांताक्रूझ पश्चिम, वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि प्रभादेवी येथील आलिशान घरांच्या किमती कमी होणार आहेत.
– 2019 च्या तिसऱया तिमाहीमधील अभ्यासानुसार, जगातील झपाटय़ाने विकसित होणाऱया प्राईम रेसिडेन्शल मार्केटमध्ये मुंबईचा आठवा क्रमांक होता. गेल्या 10 वर्षांत प्राईम रेसिडेन्शल प्रॉपर्टीच्या किमतीमध्ये 12.7 टक्क्यांची वाढ झाली होती
पॅरिस महागडय़ा घरांचे शहर
नाइट फ्रँकच्या ताज्या अहवालानुसार, 2020 साली पॅरिस शहरात प्राईम रेसिडेंशन प्रॉपर्टीच्या किमती 7 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॅरिस शहर पहिल्या क्रमांकावर आहे. बर्लिन आणि मियामी शहरात घरांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढतील. ही शहरे दुसऱया स्थानावर आहेत. जिनिव्हा आणि सिडनी ही शहरे चार टक्के वाढीसह तिसऱया स्थानावर आहेत.


























































