
‘शांतीदूत’ अशी ओळख असलेल्या कबूतराच्या जगभरात विविध जाती आढळतात. प्रेमाचे प्रतीक आणि दिसायला सुंदर असलेल्या या छोट्याशा पक्ष्याचे वर्णन प्राचीन-आधुनिक कथा, कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळते. कबुतरावर अनेक काव्य, गीते, कविता लिहिल्या गेल्या आहेत. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे आपल्या गुप्त संदेशाकरिता राजवाड्यामध्ये कबूतर पाळत असत. ‘संवादाचे माध्यम’ म्हणून 2000 वर्षांपूर्वीपासून कबुतराचा वापर केला जात असे. मैलाचा प्रवास करूनही ते मूळ स्थानी कसे परततात? यावर मेलबर्न युनिव्हर्सिटी संशोधन करत आहे.
नेपोलियन बोनापार्टने 1815 मध्ये वॉटरलूच्या लढाईत इंग्लंडला हरवल्यानंतर कबूतराच्या माध्यमातून संदेश पाठवला होता तसेच रोमन साम्राज्याचा सेनापती ज्युलियस सीझरने कबूतरांद्वारे रोमला विजयाची बातमी पाठवली होती. कबुतरांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते अत्यंत बुद्धिमान असून ताशी 50 ते 70 किमी. वेगाने उडू शकतात. त्यांची ऐकण्याची क्षमता अत्यंत प्रभावी असते.
भूकंप, वादळ या नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीच त्यांची चाहूल त्यांना लागते. हवेमध्ये तो सहज कलाटणी घेऊ शकतो. त्यामुळे त्याला त्याचे इतर शिकारी पक्षी आणि प्राण्यांपासून रक्षण करता येते. प्रवासी मार्गावरील खुणा, काही दृश्य संकेत यांच्या आधारे ते मार्ग ओळखतात. त्यांच्याकडे एक विशेष चुंबकीय क्षमता असते, जी त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून दिशा शोधण्यासाठी मदत करते.
कबुतरांनी दिशा शोधण्याबाबत संशोधकांनी दोन सिद्धांत सांगितले आहेत. त्यापैकी पहिला असा की, कबूतर आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांच्या डोळ्याच्या रेटिनामध्ये ‘क्रिप्टोक्रोम’ नावाचे प्रथिनं असते. हे प्रथिनं विद्युत लहरी तयार करतात. यामुळे पक्ष्यांना ‘पाहण्याची’ क्षमता मिळते. दुसरा सिद्धांत हा पक्ष्यांच्या शरीरात असलेल्या चुंबकीय क्षमतेशी संबंधित आहे. चुंबकीय लहरींमुळे पक्ष्यांना दिशाज्ञान प्राप्त होते.
निसर्गात ‘मॅग्नेटोटॅक्टिक बॅक्टेरिया’ नावाचे जीवणू चुंबकीय कणांची निर्मिती करतात. हे चुंबकीय कण संशोधकांना कबुतराच्या चोचीच्या वरच्या भागात सापडले होते. त्यानंतर 2013 साली पहिल्यांदाच कबुतराच्या कानाच्या आतल्या भागातील विविध अवयवांमध्ये ‘क्यूटिकुलोसोम’ नावाचे लोहाचे कण संशोधकांना सापडले होते.




























































