
सामना प्रतिनिधी, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर विनोद तावडे यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जो माणूस स्वतः बारावी उत्तीर्ण नाही, ज्या व्यक्तीला कागद वाचता येत नाही त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा बालीश आहे, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली होती.
तलाकविरोधी कायद्याचा मसुदा रद्द करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले असून हे आश्वासन म्हणजे मुस्लिम समाजातील महिलांना पुन्हा अंधाराच्या खाईत ढकलण्याचे कृत्य आहे. खासदार सुप्रिया सुळे यावर गप्प का, असा सवाल तावडेंनी केला होता.





























































