
रुग्णांच्या आर्थिक लुबाडणुकीसह आरोग्याचा बाजार मांडल्याचा एक धक्कादायक प्रकार रौप्यनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी गावात समोर आला आहे. एका लॅबमध्ये प्लेटलेट्स कमी दाखवून रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याचा रिपोर्ट देण्यात आला. मात्र, त्याच रुग्णाने दुसऱया दोन लॅबमध्ये तपासणी केली असता, त्याच्या प्लेटलेट्सही जास्त आढळल्या, तसेच डेंग्यूची बाधाही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने याची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
चांदीचे दागिने घडविणाऱया व रौप्यनगरी म्हणून परिचित असलेल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावात एका रुग्णासंदर्भात संबंधित डॉक्टर आणि एका पॅथॉलॉजीने मांडलेला बाजार गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यळगुड येथील रुग्णालयात दाखल झालेल्या महिला रुग्णाच्या रक्ताची तपासणी संबंधित डाक्टरने सांगितलेल्या लॅबकडून करण्यात आली. त्या अहवालात त्या महिलेच्या प्लेटलेट्स 89 हजार दाखविण्यात आल्या. तसेच, डेंग्यू पॉझिटिव्ह दाखविण्यात आले. या तपासणीबाबत संशय आल्याने, त्या महिला रुग्णाच्या पतीने अन्य दोन लॅबमध्ये तपासणी केली. एकाकडे 99 हजार व दुसऱया लॅबकडे 1 लाख 6 हजार प्लेटलेट्स नमूद करण्यात आल्या. शिवाय या दोन्ही लॅबने डेंग्यू निगेटिव्ह अहवाल दिल्याने, डॉक्टर आणि त्यांच्याशी संबंधित या लॅबकडून रुग्णांची आर्थिक लुबाडणूक तसेच आरोग्याचा मांडलेल्या बाजाराचे वास्तव समोर आले आहे.
संबंधित डॉक्टर आणि त्या लॅबचालकाने अशाप्रकारे कितीतरी रुग्णांची फसवणूक केल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे. संबंधित महिला रुग्णाच्या नातेवाईकांकडून त्या डॉक्टरसह लॅबवर कारवाई करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे तक्रार करण्यात येत आहे.
डॉक्टर सांगतील तोच अहवाल!
हुपरी परिसरात लॅब आणि डॉक्टरांचे संगनमत असून, प्रत्येक रुग्णाच्या तपासणीसाठी लॅबचालकांना 70 ते 80 टक्के कमिशन डॉक्टरांना द्यावे लागते. शिवाय दुसऱया लॅबला काम देण्याची धमकी यामुळे डॉक्टर सांगतील तोच अहवाल द्यावा लागतो. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा अक्षरशः बाजार मांडल्याचे काही प्रामाणिक लॅबचालक व डॉक्टरांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले. वैद्यकीय पेशाला काळीमा फासणाऱया अशा यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांच्याकडून होत आहे. याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील विविध असोसिएशनकडे तक्रारी होत आहेत.
एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह, तर दुसऱया लॅबमध्ये रुग्ण निगेटिव्ह आल्याच्या प्रकरणात जिल्हा वैद्यकीय अधिकाऱयांना संबंधितांची चौकशी करण्यास सांगण्यात येणार आहे. चौकशीअंती दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
– डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्याधिकारी.



























































